२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:03 IST2025-07-29T15:08:20+5:302025-07-29T16:03:02+5:30

अमित शाहांच्या काळात मणिपूर जळत आहे, दिल्लीत दंगली झाल्या, पहलगाम घडले आणि आजही ते गृहमंत्री आहेत असं सांगत त्यांनी शाह यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. 

Pahalgam terror Attack, Operation Sindoor Debate in Lok sabha: Priyanka Gandhi directly attacks Amit Shah, mentioning Mumbai attacks | २६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...

२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...

नवी दिल्ली - देशात युद्ध सुरू होण्याआधीच संपले, हे युद्ध संपवण्याची भाषा आपलं सैन्य करत नाही. सरकार करत नाही तर अमेरिकेत बसून डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. हे आपल्या पंतप्रधानांचे अपयश आहे. ११ वर्षापासून तुम्ही सत्तेत आहात. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी कोण घेणार? युद्धविराम का झाला याचे उत्तर दिले जात नाही. ऑपरेशन सिंदूर असेल तर त्याचे श्रेय घेण्याचे काम पंतप्रधान मोदी करतात परंतु हल्ल्याची जबाबदारी कोणच घेत नाही असं सांगत काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट निशाणा साधला. 

खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या की, पहलगाम हल्ल्यानंतर लष्करप्रमुखांनी, गुप्तचर प्रमुखांनी राजीनामा दिला का? गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला का? राजीनामा तर सोडाच, त्यांनी जबाबदारीही घेतली नाही. तुम्ही इतिहासाबद्दल बोलला, मी वर्तमानाबद्दल बोलेन. तुम्ही ११ वर्षे सत्तेत आहात, जबाबदारी घ्यायला हवी. काल मी पाहत होते, गौरव गोगोई यांनी जबाबदारीबद्दल बोलताना राजनाथ सिंह मान हलवत होते, पण गृहमंत्री अमित शाह हसत होते. मुंबई हल्ल्यानंतर मनमोहन सरकारने काहीही केले नाही असं सत्ताधारी पक्ष सांगतात पण ती घटना सुरू असताना त्या दहशतवाद्यांना तिथेच मारले. एक वाचला ज्याला नंतर पकडण्यात आले आणि २०१२ मध्ये त्यालाही फाशी देण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. उरी-पुलवामाच्या वेळी राजनाथ सिंह गृहमंत्री होते, आज ते संरक्षणमंत्री आहेत. अमित शाहांच्या काळात मणिपूर जळत आहे, दिल्लीत दंगली झाल्या, पहलगाम घडले आणि आजही ते गृहमंत्री आहेत असं सांगत त्यांनी शाह यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. 

तसेच ऑपरेशन सिंदूरचा उद्देश दहशतवाद संपवणे होता मग पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले नसते. प्रश्नांपासून वाचण्याचा प्रयत्न सरकार कायम करते. देशातील जनतेला उत्तरे दिली जात नाही. केवळ राजकारण, पीआर आणि पब्लिसिटी आहे. जनतेसाठी त्यांच्या मनात जागा नाही. पहलगाममध्ये जे घडले त्याचे देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनाला वेदना झाल्या. या सभागृहात जवळपास सगळ्यांकडे सुरक्षा आहे. आम्ही जिथे जातो तेव्हा सुरक्षा असते. पहलगाम हल्ल्यात २६ कुटुंब उद्ध्वस्त झाली. पुरुषांना त्यांच्या कुटुंबासमोर मारले. २५ भारतीय मारले गेले त्यांच्यासाठी कुठलीही सुरक्षा नव्हती हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही आणि त्याची तुम्हाला लाजही वाटत नाही असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं. 

दरम्यान, पहलगाममध्ये जो हल्ला झाला तिथे पर्यटकांना रामभरोसे सोडण्याचं काम सरकारने केले. देशातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे? देशातील पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्र्यांची ही जबाबदारी नाही का? पहलगाम हल्ल्याच्या २ आठवड्याआधी गृहमंत्री सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी काश्मीरला गेले होते. तिथे दहशतवादावर आपण विजय मिळवला असं ते म्हणाले. मात्र पहलगाम हल्ल्याची जबाबदारी कुणीच घेत नाही. टीआरएफ दहशतवादी संघटनेने २०२० ते २०२५ या काळात २५ दहशतवादी हल्ले केले. २०२३ मध्ये या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले. भारतावर असा भयानक हल्ला होणार आहे याची सरकारला माहिती नाही. आपल्याकडे अशी कुठलीही यंत्रणा नाही का? हे आपल्या संस्थांचे अपयश आहे की नाही असा प्रश्न प्रियंका गांधी यांनी केला. 

Web Title: Pahalgam terror Attack, Operation Sindoor Debate in Lok sabha: Priyanka Gandhi directly attacks Amit Shah, mentioning Mumbai attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.