जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 19:00 IST2025-10-05T18:38:48+5:302025-10-05T19:00:44+5:30
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
Pahalgam Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाच महिन्यांनंतर सुरक्षा दलांना गेल्या आठवड्यात एक मोठे यश मिळाले. हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या काश्मीरमधील कुलगाम येथील रहिवासी मोहम्मद युसूफ कटारी याला सुरक्षा दलांनी अटक केली. २६ वर्षीय या तरुणावर दहशतवाद्यांना रसद पुरवल्याचा आरोप आहे, ज्यामुळे बारसन व्हॅलीमध्ये २६ निष्पाप पर्यटकांची निर्घृण हत्या झाली. अटकेनंतर युसूफला १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. आता युसूफ कटारीच्या चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आहे.
पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा सहकारी मोहम्मद युसूफ कटारी याने अनेक खुलासे केले आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कटारीने चौकशीदरम्यान कबूल केले की तो दहशतवाद्यांना चार वेळा भेटला आणि त्यांना मोबाईल चार्जरही पुरवत होता. पोलिसांनी २४ सप्टेंबर रोजी कटारीला अटक केली. कटारी हा कुलगामचा रहिवासी आहे. कटारीने हल्ला करणाऱ्या द रेझिस्टन्स फ्रंटच्या दहशतवाद्यांना लॉजिस्टिक सपोर्ट पुरवला होता.
ऑपरेशन महादेव दरम्यान जप्त केलेल्या वस्तूंच्या चौकशीतून कटारीची अटक झाली. जूनच्या सुरुवातीला, राष्ट्रीय तपास संस्थेने परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर यांना अटक केली होती. तपासात लष्कर कमांडर सुलेमान शाह, अफगाण आणि जिब्रान या तीन दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. २८ जुलै रोजी ऑपरेशन महादेवमध्ये हे तीन दहशतवादी मारले गेले होते. मोहम्मद युसूफ कटारीने दहशतवाद्यांना अँड्रॉइड फोन चार्जर पुरवला होता, जो त्याच्याविरुद्ध महत्त्वाचा पुरावा ठरला आणि त्याला अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान अर्धवट नष्ट झालेल्या अँड्रॉइड मोबाईल फोन चार्जरची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी कटारीवर लक्ष केंद्रित केले. श्रीनगर पोलिसांनी अखेर चार्जरचा मूळ मालक शोधून काढला ज्याने फोन एका डीलरला विकला होता. ही माहिती हळूहळू पोलिसांना कटारीपर्यंत घेऊन गेली. कटारी उंच भागात भटक्या विद्यार्थ्यांना शिकवत असे.
पहलगाम हल्ल्याच्या दोन महिन्यांनंतर २३ जून रोजी एनआयएने पहलगाममधून दोन जणांना अटक केली होती. एनआयएच्या तपासात या दोघांनी हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना आश्रय दिला होता. परवेझ आणि बशीर यांनी हल्ल्यापूर्वी जाणूनबुजून तिन्ही दहशतवाद्यांना हिल पार्कमधील एका तात्पुरत्या झोपडीत ठेवले होते. त्यांनी त्यांना जेवण आणि इतर सुविधा पुरवल्या होत्या.
दरम्यान, २२ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आणि १६ जण गंभीर जखमी झाले. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धार्मिक ओळखीच्या आधारे लक्ष्य केले. ही घटना पहलगाम शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बायसरन खोऱ्यात घडली होती.