'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 12:00 IST2025-08-05T11:58:54+5:302025-08-05T12:00:14+5:30
आज भाजपच्या नेतृत्वातील NDA ची बैठक पार पडली, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
NDA Meeting: संसद भवनात आज(दि.५) राष्ट्रीय लोकशाही आघाडी(NDA) ची बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बैठकीत सन्मान करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरवरुन विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. 'ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची मागणी करुन विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला,' अशी बोचरी टीका पीएम मोदींनी केली.
पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा
ऑपरेशन सिंदूरवरुन संसदेत बराच गदारोळ झाला. विरोधकांकडून सरकारवर अनेक आरोप करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीत म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची मागणी करुन विरोधकांनी चूक केली, स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला. यामुळे आता त्यांना लाजीरवाणे वाटतेय. विरोधकांनी दररोज अशा चर्चा कराव्यात. हे आमचे मैदान आहे. या मैदानात साक्षात देव माझ्यासोबत आहे,' असेही मोदी यावेळी म्हणाले.
गृहमंत्री अमित शाहांचे कौतुक
यावेळी पीएम मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, 'लालकृष्ण अडवाणीनंतर अमित शाह हे सर्वात जास्त काळ गृहमंत्री राहिले आहेत. ही फक्त सुरुवात आहे.' एनडीएच्या या बैठकीत पंतप्रधान मोदींनी खासदारांना आगामी कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होण्यास सांगितले. यासोबतच त्यांनी संबंधित संसदीय मतदारसंघात तिरंगा यात्रा आणि क्रीडा दिनासारखे कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला.
बैठकीत दोन ठराव मंजूर
एनडीएच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेववर ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावात पंतप्रधान मोदी तसेच भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह लोकसभा आणि राज्यसभेतील प्रमुख एनडीए नेते बैठकीला उपस्थित होते.