विरोधी पक्षांची 14 जुलैला होणार पुन्हा बैठक, शिमल्याऐवजी जयपूरमध्ये होऊ शकते आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 10:12 IST2023-06-29T10:11:10+5:302023-06-29T10:12:08+5:30
Opposition Alliance: सुत्रांच्या म्हणाण्यानुसार, पुढील बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

विरोधी पक्षांची 14 जुलैला होणार पुन्हा बैठक, शिमल्याऐवजी जयपूरमध्ये होऊ शकते आयोजन
नवी दिल्ली : पुढील वर्षी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांची एकजूट मजबूत करण्याच्या तयारी वेग आला आहे. पाटण्यातील बैठकीनंतर आता विरोधी पक्षांची पुढील बैठक १४ जुलै रोजी होणार आहे. सध्या या बैठकीसाठी शिमला शहराची निवड करण्यात आली असली तरी भविष्यात या ठिकाणी बदल होऊन जयपूरमध्ये बैठक होऊ शकते.
सुत्रांच्या म्हणाण्यानुसार, पुढील बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आगामी बैठकीचे नेतृत्व काँग्रेस पक्ष करणार आहे. तत्पूर्वी, २३ जूनला बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक झाली होती आणि त्याचे यजमानपद मुख्यमंत्री नितीश कुमार होते.
१० ते १२ जुलै दरम्यान विरोधी पक्षांच्या एकजुटीची बैठक होऊ शकते, असे आधी सांगितले जात होते. मात्र आता परिस्थिती स्पष्ट झाली आहे. पाटणा येथे झालेल्या बैठकीत पुढील बैठकीबाबत चर्चा झाली आणि शिमलाचे नाव पुढे आले. बैठकीसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची मतेही घेण्यात आली. विरोधी पक्षांची ही बैठक भविष्यातील फॉर्म्युल्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीतच भविष्याची रूपरेषा ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
याचबरोबर, विरोधी पक्षांच्या आगामी बैठकीपूर्वी त्यांच्या नावाबाबतची स्थितीही जवळपास स्पष्ट झाली आहे. विरोधी पक्षांच्या या आघाडीला पेट्रियॉटिक डेमोक्रेटिक अलायन्स (PDA) असे नाव दिले जाऊ शकते. १४ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत नावाची घोषणाही होऊ शकते. पाटणा येथील बैठकीनंतर सीपीआयचे सरचिटणीस डी राजा यांनी विरोधी आघाडीचे नाव प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक अलायन्स असेल असे सांगितले होते.
विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस पक्ष तसेच शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, लालू यादव यांचा आरजेडी, नितीश कुमार यांचा जेडीयू, अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष, उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस अशा एकूण १५ पक्षांचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या बैठकीत काँग्रेस पक्षाच्यावतीने अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राहुल गांधीही पाटण्याला गेले होते.