Operation Sindoor: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काल(दि.२८) पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर दीर्घ चर्चा झाली. यादरम्यान, लोकसभेत बराच गोंधळ झाला. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या भाषणावेळी विरोधी पक्ष वारंवार गोंधळ घालत होता. विरोधकांच्या गोंधळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संतापले. विरोधकांवर निशाणा साधत ते म्हणाले की, "विरोधक भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांवर नाही, तर पाकिस्तानवर जास्त विश्वास ठेवतात. म्हणूनच ते तिथे बसले आहेत आणि पुढील २० वर्षे तिथेच बसणार आहेत."
विरोधी पक्ष सत्य ऐकू शकत नाहीगृहमंत्री पुढे म्हणतात, "भारत देशाची शपथ घेतलेले परराष्ट्र मंत्री येथे बोलत आहेत, त्यांच्यावर विरोधकांचा विश्वास नाही, तर पाकिस्तानवर जास्त विश्वास आहे. त्यांच्या पक्षात परदेशाचे किती महत्त्व आहे, मी समजू शकतो. परंतु, याचा अर्थ असा नाही की, त्यांच्या पक्षाच्या सर्व गोष्टी येथे सभागृहात लादल्या पाहिजेत. विरोधी पक्ष सत्य ऐकू शकत नाही. तुमचा भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांवर विश्वास नाही. हेच कारण आहे की, तुम्ही तिथे (विरोधी बाकांवर) बसला आहेत आणि पुढील २० वर्षे तिथेच बसणार आहेत."
शाह पुढे म्हणाले, "जेव्हा त्यांचे अध्यक्ष बोलत होते, तेव्हा आम्ही त्यांचे बोलणे धीराने ऐकत होतो. त्यांनी किती खोटे बोलले आहे, हे मी उद्या तुम्हाला सांगेन. आता त्यांना सत्य ऐकायचे नाही. सभागृहात बसल्याबसल्या गदारोळ घालण्याचे काम त्यांना चांगले जमते. पण, जेव्हा इतक्या गंभीर विषयावर चर्चा होत असते, तेव्हा सरकारच्या एका प्रमुख विभागाच्या मंत्र्यांना बोलताना अडवणे विरोधकांना शोभते का?" असा प्रश्न त्यांनी विचारला.
ऑपरेशन सिंदूरवर जयशंकर काय म्हणाले?लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेदरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, "भारत दहशतवादाविरुद्ध, विशेषतः पाकिस्तानबाबत झिरो टॉलरन्स धोरणावर ठाम आहे. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर कोणतेही चर्चा झाली नाही", असेही त्यांनी स्पष्ट केले.