Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
By संतोष कनमुसे | Updated: May 7, 2025 12:37 IST2025-05-07T12:34:50+5:302025-05-07T12:37:12+5:30
Operation Sindoor : भारतीय लष्कराने काल पीओकेमधील ९ दहशतवादी स्थळांवर हल्ला केला.

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय लष्कराने रात्री १.३० बदला घेतला. लष्कराने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले. भारतीय लष्कराने मध्यरात्री केलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला आहे.या हल्ल्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया आल्या आहेत, तर भारतातही जल्लोष करण्यात आला आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. भारताने पाणी, व्यापार आणि टपाल सेवा बंद केली आहे. त्यामुळे पाकिस्तानची मोठी कोंडी झाली आहे. पहलगाम हल्ल्यापासूनच पाकिस्तानच्या लष्कराकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला जात आहे. दरम्यान, काल भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. ९ दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केले.
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
हल्ल्याचं देशभरात स्वागत
भारतीय लष्कराने पीओके मधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर केलेल्या हल्ल्याचे देशभरात स्वागत होत आहे. दिल्ली, गुजरात तसेच महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, मुंबईसह अन्य शहरांमध्ये नागरिकांनी जल्लोष व्यक्त केला.
सर्वपक्षीय नेत्यांकडून 'ऑपरेशन सिंदूर'चं कौतुक
'ऑपरेशन सिंदूर'चे सर्वपक्षीय नेत्यांकडून कौतुक करण्यात आले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर एक पोस्ट करत भावना व्यक्त केल्य. राहुल गांधींनी म्हटले आहे की, 'आम्हाला भारतीय लष्कराचा अभिमान आहे. जय हिंद.'
एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन औवेसी यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराचे अभिनंदन केले.
असदुद्दीन औवेसी म्हणाले, "आपल्या सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या कारवाईचे मी स्वागत करतो. पाकिस्तानला अशा प्रकारे धडा शिकवणे आहे की, पुन्हा कधी पहलगाम घडू नये. पाकिस्तानातील दहशतवादी व्यवस्थेला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकायला हवे. जय हिंद", अशी प्रतिक्रिया असदुद्दीन औवेसी यांनी व्यक्त केली आहे.
अजित डोवाल अॅक्शनमोडवर
भारतीय लष्कराने मंगळवारी पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यानंतर लगेचच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी बोलून त्यांना या कारवाईची माहिती दिली. याशिवाय, भारताने या हवाई हल्ल्याबाबत ब्रिटन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि रशियाशीही चर्चा केली आहे.
राजनाथ सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार
दरम्यान, आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
तिनही सैन्य दलाने पत्रकार परिषद घेतली
आज सकाळी १०.३० वाजता तिनही सैन्य दलाने पत्रकार परिषद घेऊन या हल्ल्याची माहिती दिली. या हल्ल्यामध्ये सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आले नव्हते, फक्त दहशतवादी तळांवर हल्ला केल्याची माहिती दिली.
जगभरातून भारताला पाठिंबा
भारताने पहलगाम हल्ल्याचा आज बदला घेतला. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केल्यानंतर जगभरातून भारताला पाठिंबा मिळत आहे. जपानने या हल्ल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे. "आम्हाला खूप काळजी वाटते की या घटनेमुळे प्रतिशोध भडकू शकतो आणि लष्करी संघर्ष वाढू शकतो. दक्षिण आशियात शांतता सुनिश्चित करण्यासाठी, आम्ही भारत आणि पाकिस्तान या दोघांना संयम राखण्याचे आणि संवादाद्वारे परिस्थिती स्थिर करण्याचे आवाहन करतो." जपानचे मुख्य मंत्रिमंडळ सचिव योशिमासा हयाशी यांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन केलं आहे.
या हल्ल्यावर चीनची प्रतिक्रिया आली आहे. चीनच्या प्रवक्यांनी सांगितले की, चीन दहशतवादाला विरोध करतो. आम्ही दोन्ही पक्षांना शांतता आणि स्थैर्याला प्राधान्य देण्याचे आवाहन करतो. संयम बाळगा आणि परिस्थिती आणखी गुंतागुंतीची करू शकेल अशी पावले उचलू नका.
इस्त्रायने दिले भारताला समर्थन
ऑपरेशन सिंदूरनंतर भारतातील इस्रायली राजदूत रुवेन अझर यांनी भारताला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले- इस्रायल भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे पूर्ण समर्थन करतो. दहशतवाद्यांना हे माहित असले पाहिजे की निष्पाप लोकांविरुद्ध त्यांनी केलेले भयंकर गुन्हे त्यांना लपण्यासाठी जागा सोडणार नाहीत.