Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 13:34 IST2025-05-07T13:33:42+5:302025-05-07T13:34:41+5:30
Operation Sindoor : भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा केला.

Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या हल्ल्यानंतर देशभरातून बदला घेण्याची मागणी सुरू होती. दरम्यान, काल भारतील लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पीओके मधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. लष्कराच्या या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले. पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर, भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासोबत पत्रकार परिषदेद्वारे ऑपरेशन सिंदूरची महत्त्वाची माहिती सांगितली.
ही पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. यामुळे सिंग चर्चेत आल्या आहेत. व्योमिका सिंग यांनी सहावीत असल्यापासूनच भारतीय हवाई दलात जाण्याचे ठरवले होते. व्योमिका या नावाचा अर्थ आकाशात राहणारी असा होतो. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स जॉईन केला.
लष्करात जाणारी कुटुंबातील पहिलीच महिला
व्योमिका सिंग यांनी त्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर हवाई दल जॉईन केले. व्योमिका या त्यांच्या कुटुंबातील सैन्यात असणाऱ्या
पहिल्याच महिला आहेत. भारतीय हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून नियुक्त करण्यात आले. १८ डिसेंबर २०१९ रोजी त्यांनी फ्लाइंग शाखेत कायमस्वरूपी कमिशन मिळवले.
चेतक, चीत्ता सारखे हेलिकॉप्टर उडवले
विंग कमांडर व्योमिका सिंग यांना कठीण प्रदेशात उड्डाण करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी २५०० तासांहून अधिक वेळ उड्डाण केले आहेत. व्योमिका सिंग यांनी जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील कठीण ठिकाणी चेतक आणि चित्ता सारखी हेलिकॉप्टर उडवली आहेत. याशिवाय, त्यांनी अनेक बचाव कार्य आणि कठीण मोहिमांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.