युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:55 IST2025-05-07T12:54:25+5:302025-05-07T12:55:07+5:30
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयासह 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.

युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
Operation Sindoor: अखेर भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच आहे. मध्यरात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय लष्करी कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयासह 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यात शेकडो दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानने शरणागती पत्कारली आहे.
भारताने केलेल्या या हल्ल्याकडे दोन्ही देशांमधील युद्ध सुरू होण्याचे संकेत म्हणून पाहिले जात होते. पण, युद्ध सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, 'आम्ही भारताविरुद्ध कोणतीही शत्रुत्वाची कारवाई करत नाही आहोत, आम्ही फक्त आमच्या भूमीचे रक्षण करत आहोत. भारताने पुढील कारवाई केली नाही, तर आम्हीही काहीही करणार नाही.'
दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची गोळ्या घालून क्रुरपणे हत्या केली होती. त्या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होत होता. भारताने पाकिस्तानसोबत आरपारची लढाई करावी, अशी प्रत्येक भारतीयाची भावना होती. गेल्या काही दिवसांपासून याबाबत तयारीही सुरू होती. आता अखेर भारताने त्या घटनेचा बदला घेतलाच. बुधवारी मध्यरात्री 1-2 च्या सुमारास भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ले केले. या हल्ल्यात मोस्ट वॉन्टेड मसूद अझहाच्या कुटुंबातील 14 सदस्यांचाही खात्मा झाल्याची माहिती आहे.