पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:08 IST2025-07-07T15:07:54+5:302025-07-07T15:08:23+5:30
India Vs Pakistan War, Rafael: भारतीय लढाऊ विमानांनी आपले क्षेत्र न सोडता पाकिस्तानात हवाई हल्ले चढविले होते. यासाठी स्काल्प क्रूझ मिसाईल आणि स्पाईस २००० ब़ॉम्बचा वापर करण्यात आला होता.

पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
ऑपरेशन सिंदूरवेळीपाकिस्तान भारताच्या हवाई मायाजालात असा गुरफटला की त्यालाच समजत नव्हते आपण भारताची खरी लढाऊ विमाने पाडली की खोटी. पाकिस्तान नुसता सांगत राहिला आम्ही राफेल पाडले, राफेल पाडले... भारताची पाच विमाने पाडली. पण खरे तर भारताचे एकही लढाऊ विमान ना पाकिस्तानने पाडले ना कोणतेही भारतीय लढाऊ विमान पाकिस्तानात गेलेले. बाऊंड्रीवर राहूनच भारतीय लढाऊ विमानांनी पाकिस्तानी जमिनीवर दहशतवाद्यांना गाडले आहे.
अमेरिकेच्या एफ-१६ लढाऊ विमानाच्या माजी पायलटने भारतीय हवाई दलाने आतापर्यंतची सर्वोत्तम स्पुफिंग आणि शत्रूची फसवणूक टेक्निक वापरल्याचे म्हटले आहे. अमेरिकन F-15E स्ट्राइक ईगल आणि F-16 थंडरबर्ड पायलट रायन बोडेनहाइमर यांनी राफेलला एक असे शस्त्र लावलेले होते ज्याने पाकिस्तानला भ्रमात ठेवले असे म्हटले आहे. राफेलमध्ये एक्स गार्ड जॅमिंग डिकॉय आणि स्पेक्ट्रा ईडब्ल्यू सूट बसविलेले होते. या दोघांनी मिळून पाकिस्तानच्या PL-15E क्षेपणास्त्रांच्या डोळ्यात धूळ फेकली होती.
भारतीय लढाऊ विमानांनी आपले क्षेत्र न सोडता पाकिस्तानात हवाई हल्ले चढविले होते. यासाठी स्काल्प क्रूझ मिसाईल आणि स्पाईस २००० ब़ॉम्बचा वापर करण्यात आला होता. या मोहिमेत राफेल, सुखोई एसयू ३० आणि मिराज २००० ही लढाऊ विमाने वापरण्यात आली होती. पाकिस्तानने तीन राफेलसह पाच विमाने पाडल्याचा दावा केला होता. परंतू हा सारा खेळ राफेलच्या स्पेक्ट्रा इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर एक्स-गार्ड हे इस्रायलमध्ये बनवलेले फायबर-ऑप्टिक टोव्ड डिकॉय यांनी केला होता. ही प्रणाली जर एकत्र करता आली नसती तर कदाचित भारताला हे शक्य झाले नसते.
फायबर-ऑप्टिक टोव्ड डिकॉय हे ३० किलो वजनाचे उपकरण राफेल जेटच्या मागे वायरने ओढले जाते. हे शत्रूच्या रडार आणि क्षेपणास्त्रांना फसवण्यासाठी डिझाइन केलेले आहे. एक्स-गार्ड ३६० अंश त्रिजेमध्ये जॅमिंग सिग्नल पाठवते. ज्यामुळे शत्रूच्या रडार आणि क्षेपणास्त्रांच्या डिटेक्शन प्रणालीला गोंधळात टाकते. रडार सिग्नेचर बनावट मिळाल्याने शत्रूची उपकरणे तेच खरे असल्याचे मानतात आणि तिकडेच जातात. परंतू ते खोटे मृगजळासारखे असते. यामुळे शत्रूचा वार वाया जातो. एक्स-गार्ड आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) वापरते जे डॉपलर शिफ्ट आणि रडार सिग्नलची सिग्नेचर कॉपी करते. तसेच शत्रूला रिअल टाईम वेगवेगळ्या ठिकाणाचे सिग्नल पाठविते. यामुळे त्यांची विमाने किंवा मिसाईल कुठे जाऊ आणि कुठे नको अशा संभ्रमात राहतात आणि राफेल आपले काम फत्ते करून परत येते, हीच टेक्निक भारतीय हवाई दलाने वापरली आणि पाकिस्तानला चकविल्याचे बोडेनहाइमर यांनी सांगितले आहे.