पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 18:41 IST2025-05-08T18:38:39+5:302025-05-08T18:41:38+5:30

Operation Sindoor: 'जगातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचे दहशतवादासोबतचे संबंध मान्य केले आहेत.'

Operation Sindoor: Pakistan is the center of terrorism, always protected terrorists; Foreign Secretary exposes Pakistan | पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल

पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल

Operation Sindoor: पहलगाम दहशथवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गतपाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या घटनेत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे सुमारे शंभर दहशतवादी ठार झाले. त्या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननेभारतातील 15 शहरांवर हल्ले केले, पण भारतीय सुरक्षा यंत्रणांनी हे हल्ले परतून लावली. या बाबत परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली, यात परराष्ट्र सचिवांनी या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली आणि पाकिस्तानची पोलखोलही केली.

पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र आहे
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र असतानाही त्याची जबाबदारी नाकारत आहे. जगातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात आहे. दहशतवाद्यांच्या जनाज्यात पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी आणि नेते मंडळी जातात. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचे दहशतवादासोबतचे संबंधही मान्य केले आहेत. पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याची पाकिस्तानची मागणी देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. पठाणकोट आणि मुंबई हल्ल्यांबाबत भारताने सर्व पुरावे दिले पण पाकिस्तानने कोणतीही कारवाई केली नाही.

पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांना संरक्षण देतो
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सीमेपलीकडून आपल्याविरुद्ध बरीच चुकीची माहिती दिली जात आहे, वाढत्या तणावाबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. पण पहिली गोष्ट म्हणजे पहलगाममधील हल्ला हा तणाव वाढण्याचे पहिले कारण आहे, भारतीय लष्कराने काल त्याला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की 'द रेझिस्टन्स फ्रंट' (टीआरएफ) गट हा लष्कर-ए-तैयबाचा एक सुप्रसिद्ध मोर्चा आहे. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीबद्दलची सर्व माहिती आम्ही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला (UNSC) देत आहोत. टीआरएफबद्दल अपडेट्स सतत दिले जात आहेत. विक्रम मिस्री यांनी एक धक्कादायक खुलासा केला की जेव्हा UNSC च्या निवेदनात TRF चे नाव समाविष्ट करण्याची वेळ आली तेव्हा फक्त पाकिस्ताननेच त्याला विरोध केला आणि ते नाव काढून टाकले. हे स्पष्ट संकेत आहे की पाकिस्तान अजूनही या दहशतवादी गटांना संरक्षण आणि पाठिंबा देत आहे.

आम्ही फक्त वाढत्या तणावाला प्रतिसाद देत आहोत
विक्रम मिस्री पुढे म्हणतात, जेव्हा UNSC मध्ये पहलगामबद्दल चर्चा सुरू होती, तेव्हा पाकिस्तानने TRF (द रेझिस्टन्स फ्रंट) च्या भूमिकेला विरोध केला होता. टीआरएफने एकदा नाही तर दोनदा हल्ल्याची जबाबदारी घेतल्यावर पाकिस्तानने हे केले. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी काल आणि आज स्पष्टपणे सांगितले आहे की, भारताचा प्रतिसाद अचूक आणि मोजमापाने दिला जाणारा आहे. हा विषय वाढवायचा आमचा हेतू नाही. आम्ही फक्त वाढत्या तणावाला प्रतिसाद देत आहोत. कोणत्याही लष्करी स्थळांवर हल्ला झाला नाही. आम्ही फक्त पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे. 

पाकिस्तान जगाची दिशाभूल करत आहे
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पुनरुच्चार केला की, भारताची कारवाई दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यापुरती मर्यादित होती; आम्ही नागरिकांवर किंवा लष्करी आस्थापनांवर हल्ला केला नाही, तर फक्त दहशतवादी लपण्याच्या ठिकाणांवर हल्ला केला. पाकिस्तानच्या मंत्र्यांनी येथे दहशतवादी नसल्याचे केलेले विधान पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे आहे. पाकिस्तान अजूनही जागतिक दहशतवादाचे केंद्र आहे.

लादेनला शहीद कोणी म्हणले..?

ओसामा बिन लादेन पाकिस्तानत सापडला, तिथेच मारला गेला अन् पाकिस्तानने त्याला 'शहीद' म्हटले. पाकिस्तानने "संयुक्त चौकशी" करण्याची ऑफर पुन्हा एकदा वेळ वाचवण्यासाठी आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी एक रणनीती आहे. 26/11 आणि पठाणकोट सारख्या हल्ल्यांच्या तपासात भारताने सहकार्य केले, परंतु पाकिस्तानने नाही. जर पाकिस्तानने पुन्हा हल्ला केला, तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. पाकिस्तानकडून पुढील कोणत्याही कृतीला योग्य प्रतिसाद दिला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Web Title: Operation Sindoor: Pakistan is the center of terrorism, always protected terrorists; Foreign Secretary exposes Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.