Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 14:37 IST2025-05-07T14:36:44+5:302025-05-07T14:37:50+5:30
Operation Sindoor News: भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांचे अड्डे उडवत पहलगाम हल्ल्याचे उत्तर दिले. भारताच्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेबद्दल शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी प्रतिक्रिया दिली.

Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
Avimukteshwaranand Saraswati News: पहलगामध्ये दहशतवाद्यांनी क्रूरतेचा कळस गाठला. कुणाला पतीसमोर, तर कुणाला मुलांसमोर गोळ्या घातल्या. दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूरतेला भारतीय लष्कराने जशास तसे उत्तर दिले. ७ मे रोजीच्या रात्री भारताने दहशतवाद्यांची आणि त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानची झोपच उडवली. पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी कौतुक केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहलगाममधील बैसरन पठारावर २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. त्याचबरोबर १७ पर्यटक या हल्ल्यात जखमी झाले. या घटनेनंतर भारतातच नव्हे तर जगभरात पडसाद उमटले. भारतीयांनी आणि जगभरातील देशांनी या हल्ल्याची निंदा केली. तसेच दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही केली गेली.
भारताने ७ मे रोजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांना धडा शिकवला. भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत ९ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. तर ९० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईचे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी स्वागत केले.
आता कुंकवाचा पराक्रम कळला असेल?
"बघा सिंदूर (कुंकू) आपली आन, बाण आणि शान आहे. आमच्या माता-भगिनी जेव्हा तो लावतात, तेव्हा त्यांचा प्रकट होतो. त्या कुंकवाचा तुम्ही अपमान केला आहे. एक भगिनीसमोर तुम्ही तिच्या पतीला मारलं. तर हे स्वाभाविक आहे की, जे कुंकू तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न केला, त्याच कुंकवासाठी आमच्या सरकारने ऑपरेशन केलं. आता तुम्हाला कळेल की, कुंकवाचा काय पराक्रम आहे", असे अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.
बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय उडवले
भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरमध्ये या हे मुख्यालयच उडवले. भारताने डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. हल्ल्यानंतर त्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. मसूद अजहर आणि त्याचे कुटुंबीयही इथे राहत होते, अशीही माहिती समोर आली आहे.
भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील १० लोक ठार झाले आहेत. तर ४ जवळच्या लोकांचाही खात्मा करण्यात आला.