"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 20:37 IST2025-05-13T20:36:24+5:302025-05-13T20:37:31+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानानंतर पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवरून दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. मोदींनी स्पष्टपणे सांगितलं की ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित करण्यात आलं आहे. भारताने केवळ दहशतवाद्यांनाच नव्हे तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानी सैन्यालाही जोरदार प्रत्युत्तर देऊन आपली ताकद दाखवून दिली आहे. नरेंद्र मोदी यांच्या या विधानानंतर पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ म्हणाले की, "पाकिस्तानने दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. जगातील देशांनी पाकिस्तानात येऊन तपास करावा की येथे दहशतवादी कँप आहेत की नाही? आम्ही काही वर्षांपूर्वीच दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले आहेत."
पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर भारतीय हवाई दलाच्या योद्ध्यांना मोदींनी संबोधित केलं. "ज्या पाकिस्तानी सैन्यावर हे दहशतवादी अवलंबून होते त्यांना भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीयांनी पराभूत केलं आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला हे देखील दाखवून दिलं की पाकिस्तानमध्ये अशी कोणतीही जागा शिल्लक नाही जिथे दहशतवादी आरामात श्वास घेऊ शकतील. आम्ही घरात घुसून मारू आणि तुम्हाला पळून जाण्याची एकही संधी देणार नाही" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भारताच्या आधुनिक लष्करी क्षमतेचं कौतुक करून पाकिस्तानला थेट इशारा दिला.
"आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
"आपले ड्रोन, आपली क्षेपणास्त्र ... त्यांच्याबद्दल फक्त विचार केल्याने पाकिस्तानची अनेक दिवसांची झोप उडून जाईल. भारत ही बुद्धांची भूमी आहे आणि गुरू गोविंद सिंहजी यांचीही भूमी आहे. गुरू गोविंद सिंहजी यांनी म्हटलं होतं की, 'सवा लाख से एक लड़ाऊं, चिड़ियन ते मैं बाज तुड़ाऊं, तबै गुरु गोबिंद सिंह नाम कहाऊं' वाईटाचा नाश करण्यासाठी आणि आपल्या धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलणं ही आपली परंपरा आहे. म्हणूनच जेव्हा आमच्या बहिणी आणि मुलींचं सिंदूर हिसकावून घेतलं गेलं, तेव्हा आम्ही दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना चोख उत्तर दिलं" असं मोदींनी म्हटलं आहे.