पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमात विविध विषयांवर देशवासीयांना संबोधित केलं. 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत मोदींनी पुन्हा एकदा भारतीय सैन्याचं भरभरून कौतुक केलं. "आज संपूर्ण देश दहशतवादाविरोधात एक झाला. प्रत्येक भारतीयाने दहशतवाद संपवण्यासाठी दृढनिश्चय केला आहे. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान आपल्या सैन्याने दाखवलेल्या अद्भुत पराक्रमाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे" असं मोदींनी म्हटलं आहे.
"ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक सैन्याचं मिशन नाही. हे आपल्या दृढनिश्चयाचं, धाडसाचं आणि बदलत्या भारताचं चित्र आहे. या चित्रामुळे संपूर्ण देश देशभक्तीच्या भावनेमध्ये आणि तिरंग्याच्या रंगात रंगून गेला आहे. तुम्ही पाहिलं असेल की, देशातील अनेक शहरं, गावं आणि लहान परिसरांमध्ये तिरंगा यात्रा काढल्या गेल्या. सैन्याच्या जवानांना वंदन करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन वाहण्यासाठी हजारो लोक हातात तिरंगा घेऊन बाहेर पडले. चंदीगडचे व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते."
"'मन की बात'मध्ये आपण छत्तीसगडमध्ये झालेल्या बस्तर ऑलिम्पिक आणि माओवादग्रस्त भागातील विज्ञान प्रयोगशाळांवर चर्चा केली आहे. येथील मुलांना विज्ञानाची आवड आहे. तो खेळातही कमाल करत आहे. अशा प्रयत्नांवरून या भागात राहणारे लोक किती धाडसी आहेत हे दिसून येते. या लोकांनी सर्व आव्हानं असूनही आपलं जीवन सुधारण्याचा मार्ग निवडला आहे" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
गावात पहिल्यांदा पोहोचली बस
"बसने प्रवास करणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण मी तुम्हाला अशा एका गावाबद्दल सांगू इच्छितो जिथे पहिल्यांदाच बस आली आहे. तिथले लोक वर्षानुवर्षे या दिवसाची वाट पाहत होते. जेव्हा बस पहिल्यांदाच गावात पोहोचली तेव्हा लोकांनी ढोल वाजवून तिचं स्वागत केलं. हे गाव माओवाद्यांच्या हिंसाचाराने प्रभावित झालं होतं. हे ठिकाण महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात आहे आणि काटेझरी असं या गावाचे नाव आहे."
गुजरातमध्ये वाढली सिंहांची संख्या
"गेल्या पाच वर्षांत गुजरातमधील गीरमध्ये सिंहांची संख्या ६७४ वरून ८९१ झाली आहे. सिंहगणनेनंतर समोर आलेली सिंहांची ही संख्या खूप उत्साहवर्धक आहे. गुजरात हे पहिलं राज्य बनलं जिथे महिलांना वन अधिकाऱ्यांच्या पदावर मोठ्या प्रमाणात नियुक्त करण्यात आलं" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये म्हटलं आहे.