इस्लामाबाद - दहशतवादाचे आम्हीही बळी आहोत, दहशतवादाविरोधात पाकिस्तान कारवाई करतो अशा खोट्या वल्गना करणाऱ्या पाकचा बुरखा पुन्हा एकदा जगासमोर फाटला आहे. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी यांच्यातील कनेक्शन उघड झाले आहे. भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये लश्कर ए तय्यबाच्या दहशतवादी तळावर टार्गेट करण्यात आले. त्यात अनेक दहशतवादी मारले गेले. या मृत दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला सैन्याचे बडे अधिकारी पोहचले होते. भारताने केलेल्या हल्ल्यात लश्करचा दहशतवादी अब्दुल राऊफ मारला गेला त्यावेळी पाकिस्तानी सैन्याचे अनेक अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत खांद्याला खांदा लावून अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
लश्कर ए तय्यबाचे मुख्यालय पाकिस्तानच्या पंजाब इथल्या मुरीदके येथे आहे. लाहोरपासून ३० किमी अंतरावर हे ठिकाण असून तिथे भारताने टार्गेट हल्ला केला. ही तीच दहशतवादी संघटना आहे जिने २००८ साली मुंबईत दहशतवादी हल्ला घडवला होता. संयुक्त राष्ट्रासह अनेक देशांनी लश्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेवर बंदी आणली आहे. भारताविरोधात अनेक दहशतवादी कट रचण्याचं काम या संघटनेने केले आहे परंतु यावेळी भारतीय सैन्याने त्याचे मुख्यालयच उडवून टाकले. भारताच्या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरच्या कुटुंबातील १० जणांचा खात्मा झाला.
अब्दुल राऊफच्या अंत्यविधीला पाकिस्तानी सैन्य अधिकारी पोहचल्याने या दहशतवादी संघटना पाकिस्तानी सैन्याकडूनच चालवण्यात येतात हे उघड झाले आहे. पाकिस्तानी सैन्य जिहादच्या नावाखाली दहशतवादी संघटनांना पोसते आणि त्यांचा वापर भारताविरोधात केला जातो. परंतु दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा पवित्रा भारताने घेतला आहे. ही पहिलीच वेळ नाही जेव्हा पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांसोबत दिसलेत, तर याआधीही बऱ्याचदा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे अधिकारी आणि दहशतवादी यांच्यातील कनेक्शन पुढे आले आहे. २०१२ साली मुरीदके येथे झालेल्या कार्यक्रमात माजी आयएसआय प्रमुख जनरल हामिद गुल दहशतवाद्यांसोबत व्यासपीठावर दिसले होते.
२०१२ मध्ये अमेरिकेच्या एका रिपोर्टमध्येही पाकिस्तानच्या पंजाब सरकारकडून लश्कर ए तय्यबाला धार्मिक संस्थेच्या नावाखाली कोट्यवधी सरकारी फंड दिला जात असल्याचं छापले होते. संयुक्त राष्ट्राने या दहशतवादी संघटनेला काळ्या यादीत टाकले होते तेव्हा ही मदत पंजाब सरकारने केल्याचा आरोप होता. पाकिस्तान कायम दहशतवादाला खतपाणी घालत असून अनेक दहशतवादी तिथे पोसले जातात असा आरोप भारत करते, त्या आरोपांना आजच्या समोर आलेल्या फोटो, व्हिडिओने बळ मिळाले आहे. पाकिस्तानी सैन्य अधिकारी लश्कर ए तय्यबाच्या दहशतवाद्यांसोबत दिसले हा पुरावा भारत जगासमोर मांडू शकतो.