Operation Sindoor ISRO : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अतंर्गत पाकिस्तानला चांगला धडा शिकवला. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले. सध्या दोन्ही देशांमध्ये युद्धविराम घोषित झाला असला तरी, धोका अजून टळलेला नाही. याच पार्श्वभूमीवर ISRO चे 10 डोळे चोवीस तास पाकिस्तानच्या बारीक-सारीक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. इस्रोचे प्रमुख व्ही. नारायण यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे.
आगरतळा येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या (CAU) पाचव्या दीक्षांत समारंभात बोलताना इस्रो प्रमुख व्ही. नारायणन यांनी सांगितले की, तुम्हा सर्वांना आपल्या शेजाऱ्यांबद्दल माहिती आहे. आपल्याला आपल्या देशाची सुरक्षा सुनिश्चित करायची असेल, तर आपल्याला आपल्या उपग्रहांद्वारे सेवा द्यावी लागेल. आपल्याला आपल्या 7,000 किलोमीटरच्या समुद्री क्षेत्राचे निरीक्षण करावे लागेल. उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाशिवाय आपण हे साध्य करू शकत नाही. त्यामुळेच सुरक्षेसाठी धोरणात्मक उपाय म्हणून, इस्रोचे 10 उपग्रह चोवीस तास सर्व बारीक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत."
भारताने 127 उपग्रह प्रक्षेपित केलेआतापर्यंत इस्रोने एकूण 127 भारतीय उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यामध्ये खाजगी ऑपरेटर आणि शैक्षणिक संस्थांचे उपग्रह देखील समाविष्ट आहेत. यापैकी 22 लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये आणि 29 जिओ-सिंक्रोनस अर्थ ऑर्बिट मध्ये आहेत, जे केंद्र सरकारच्या मालकीचे आहेत. भारताकडे सुमारे एक डझन गुप्तचर किंवा पाळत ठेवणारे उपग्रह आहेत. यामध्ये कार्टोसॅट आणि आरआयएसएटी सीरिज, तसेच एमिसॅट आणि मायक्रोसॅट सीरिजचा समावेश आहे.
52 उपग्रह प्रक्षेपित केले जाणार काही दिवसांपूर्वीच इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) चे अध्यक्ष पवन कुमार गोएंका यांनी ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स 2025 मध्ये सांगितले होते की, भारत पुढील पाच वर्षांत 52 उपग्रह लॉन्च करणार आहे. याद्वारे भारताची देखरेख क्षमता वाढेल. आपल्याकडे आधीच खूप मजबूत क्षमता आहेत, फक्त त्या सतत वाढवण्याची गरज आहे. या योजनेचा उद्देश संरक्षण क्षेत्राच्या देखरेखीच्या क्षमता वाढवणे हा आहे. नवीन उपग्रहांमुळे भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाला शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास, सीमांवर लक्ष ठेवण्यास आणि लष्करी कारवायांमध्ये रिअल-टाइम समन्वय सुधारण्यास मदत होईल.