भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 06:34 IST2025-05-10T06:33:25+5:302025-05-10T06:34:13+5:30
Operation Sindoor: पाकिस्तानने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मारल्या गेलेल्यांचा बदला घेण्याचा संकल्प केला असला तरी, त्यांचे हल्ले भारताला धडा शिकवण्यासाठीच्या घोषणेप्रमाणे प्रत्युत्तरात्मक नाहीत.

भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
- हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले करून या संघर्षात विजयाचा दावा करत असताना, संयम दाखवण्याची चिन्हे देखील दिसत आहेत. पाकिस्तानने गुरुवारी रात्री २६ भारतीय ठिकाणांवर ३०० ते ४०० ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आणि बठिंडा लष्करी तळाला लक्ष्य केले, तेव्हाही भारताची प्रतिक्रिया संयमाची होती. असा अंदाज आहे की, तणाव कमी होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होऊ शकते.
भारताने याबाबत जी अधिकृत माहिती दिली त्यावेळीही कठोर शब्द वापरले नाहीत. या हल्ल्यांमध्ये काही सैनिक शहीद झाल्याचे मान्य केले. भारताच्या प्रत्युत्तराच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचेही मोठे लष्करी नुकसान झाले आणि त्यांचेही काही जवान मारले गेले. तरीही हल्ल्यांमध्ये एक मर्यादा रेषा आहे. ती अशी की, दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली नाही.
पाकिस्तानला वेळ आणि संधी
शुक्रवारीही भारताने पाकिस्तानच्या चुकीच्या कारवायांना प्रत्युत्तर देताना प्रचंड संयम दाखवला आहे आणि असे सूचित केले आहे की, ते शेजारी देशाला लष्करी कारवाईचा मार्ग सोडून देण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी देत आहे.
आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, पाकिस्तानने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मारल्या गेलेल्यांचा बदला घेण्याचा संकल्प केला असला तरी, त्यांचे हल्ले भारताला धडा शिकवण्यासाठीच्या घोषणेप्रमाणे प्रत्युत्तरात्मक नाहीत. पाकिस्तानने काही प्रमाणात उल्लंघन केले असले तरीही दोघांनीही अधिकृतपणे सांगितले आहे की, त्यांनी लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले आहे आणि मोठे नुकसान केले आहे. भारताची ५ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तान करत आहे; परंतु दाव्याला दुजोरा देणारा कोणताही पुरावा नाही.