भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 14:34 IST2025-05-12T14:34:11+5:302025-05-12T14:34:32+5:30
India-Pakistan Ceasefire: पाकिस्तानच्या डीजीएमओनी भारताच्या समकक्ष अधिकाऱ्यांना फोन केला होता. यावरची चर्चा आज होणार होती. ती अद्याप झालेली नाही.

भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारे युद्ध तुर्तास टळले आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन अण्वस्त्रधारी देश शस्त्रसंधीकडे वळले आहेत. पाकिस्तान नेहमी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आला आहे, परंतू भारत त्यास जशासतसे प्रत्यूत्तर देत आला आहे. सध्या भारत पाकिस्तानमध्ये हवाई युद्ध रंगले होते. ते थांबविण्यासाठी पाकिस्तानच्या डीजीएमओनी भारताच्या समकक्ष अधिकाऱ्यांना फोन केला होता. यावरची चर्चा आज होणार होती. ती अद्याप झालेली नाही.
दोन्ही देशांचे डीजीएमओ आज दुपारी १२ वाजता हॉटलाईनवर बोलणार होते. परंतू, हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूरवरून हायलेव्हल बैठक घेत असताना दुसरीकडे डीजीएमओंची पुढील रुपरेषा ठरविण्यासाठी चर्चा होणार होती. परंतू, ती काही कारणास्तव होऊ शकली नाही.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही चर्चा होण्याची अपेक्षित आहे. या चर्चेत तिसरा देश सहभागी होणार नाहीय. या बैठकीत युद्धविराम कायम ठेवण्यासाठी आणि दीर्घकाळ शांतता राखण्यासाठी चर्चा होऊ शकते. तसेच पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाचा मुद्दाही उपस्थित केला जाऊ शकतो.
पाकिस्तानने युद्धविरामाची विनंती केल्यानंतर भारताने ती मान्य केली होती. परंतू, त्या रात्री पाकिस्तानने पुन्हा भारतावर हल्ला केला होता. रविवारी रात्री मात्र कोणताही आगळीक केली नाही.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठका...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक मोठी बैठक झाली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस, तिन्ही सैन्याचे प्रमुख आणि इतर अनेक अधिकारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी उपस्थित होते. यानंतर मोदी यांनी एनएसए अजित डोवाल यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली.