Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 21:22 IST2025-05-12T21:19:47+5:302025-05-12T21:22:14+5:30
PM Modi On Operation Sindoor: पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केले. दहशतवाद आणि चर्चा असे अजिबात चालणार नाही, अशा शब्दात मोदींनी ठणकावून सांगितले.

Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
PM Modi Operataion Sindoor Latest News: "हे युग युद्धाचे नाहीये, पण हे युग दहशतवादाचेही नाहीये. दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स ही चांगलं विश्वाची ग्यॅरंटी आहे. पाकिस्तानी सैन्य, पाकिस्तानचे सरकार ज्या प्रकारे दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. हाच दहशतवाद एक दिवस पाकिस्तानलाच संपवून टाकेन", असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच राष्ट्राला संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत दहशवाद्यांना अशाच पद्धतीने उत्तर भविष्यातही दिले जाईल. दहशतवादी आणि त्यांना थारा देणाऱ्या पाकिस्तान सरकारला एकाच नजरेनं बघितलं जाईल, स्पष्ट मेसेज पंतप्रधान मोदींनी दिला.
पाकिस्तानला वाचायचं असेल, तर...
पंतप्रधान मोदी म्हणाले, "पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर त्याला दहशतवादी अड्ड्यांची सफाई करावीच लागेल. त्याशिवाय शांती प्रस्थापित होण्याचा कोणताही मार्ग नाहीये."
वाचा >>"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
"भारताचे मत एकदम स्पष्ट आहे की, दहशतवाद आणि संवाद एकत्रितपणे होऊ शकत नाही. दहशतवाद आणि व्यापार एकत्रितपणे चालू शकत नाही. पाणी आणि रक्तही एकत्र वाहू शकत नाही. मी आज जगालाही सांगू इच्छितो की, आमचे धोरण राहिले आहे की, पाकिस्तानसोबत जर चर्चा होईल, तर ती दहशतवादावरच होईल", अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान मोदींनी मांडली.
आता पाकव्याप्त काश्मीरच चर्चा होईल
"पाकिस्तानसोबत चर्चा होईल, ती पाकव्याप्त काश्मीरवरच होईल. आज बुद्ध पौर्णिमा आहे. भगवान बुद्धाने आपल्याला शांतीचा मार्ग दाखवला आहे. शांततेचा मार्ग सुद्धा शक्तीने होतो. भारताचं शक्तिशाली होणं गरजेचं आहे आणि गरज पडल्यावर त्या शक्तीचा वापर करणेही आवश्यक आहे. मागील काही दिवसांत भारताने तेच केले आहे", असे मोदी देशवासीयांशी बोलताना म्हणाले.
कुंकू पुसरण्याचा परिणाम दहशतवाद्यांना कळला
मोदी म्हणाले, "या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, समाज, प्रत्येक राजकीय पक्ष एका सूरात दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी उभे राहिला. आम्ही दहशततवाद्यांना मातीत गाडण्यासाठी भारताच्या सैन्याला स्वातंत्र्य दिले. आणि आज प्रत्येक दहशतवादी, प्रत्येक दहशतवादी संघटनेला कळलं आहे की, आपल्या माता-भगिनी आणि मुलींच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो."