पहलगाम दहशतनादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध चालवलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशासाठी हौतात्म्य आलेल्या सुरेंद्र कुमार यांचे पार्थिव रविवारी राजस्थानातील झुंझुनू येथील मेहरादासी गावात अंतिम निरोपासाठी आणण्यात आले होते. तेव्हा त्यांची पत्नी मोठ मोठ्याने रडत होती. त्यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. यावेळी 'सुरेंद्र कुमार अमर रहें', 'सुरेंद्र कुमार जिंदाबाद' अशा घोषणा सुरू असतानाच त्यांनी लटलटत्या हाताने आपल्या हुतात्मा पतीला सॅल्यूट केला. यावेळी आक्रोश करत त्या मोठ्याने ओरडल्या, 'आय लव्ह यू यार...प्लीज उठ जा.' यासंदर्भातला त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
सात वर्षांचा मुलगा दक्ष, याने दिला मुखाग्नी -सुरेंद्र कुमार हे ३९ विंड एअर बेसवर मेडिकल असिस्टंट सार्जंट म्हणून तैनात होते. शनिवारी (१० मे २०२५) जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात सुरेंद्र कुमार यांना हौतात्म्य आले. त्यांचे पार्थिव रविवारी अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या गावी मेहरादासी येथे आणण्यात आले होते, येथे त्यांचा सात वर्षांचा मुलगा दक्ष, याने त्यांना मुखाग्नी दिला.
हुतात्मा सुरेंद्र कुमार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती -हुतात्मा सुरेंद्र कुमार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक मोठे नेते उपस्थित होते. यात राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा, कॅबिनेट मंत्री अविनाश गलता, मंत्री कर्नल राज्यवर्धन राठौड उपस्थित होते. आपण सुरेंद्र कुमार यांच्या कुटुंबासोबत उभे आहोत, असा विश्वास राज्य सरकारने दिला. यावेळी सुरेंद्र कुमार यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदतही करण्यात आली.