गेल्या महिन्यात जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच बदला घेताना भारतीय सैन्य दलांनी मंगळवारी रात्री पाकिस्तानमध्ये जोरदार एअरस्ट्राईक केली होती. ऑपरेशन सिंदूर नाव देत भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, या हल्ल्यात दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तरी या हल्ल्यात किती जण मृत्युमुखी पडले याची नेमकी आकडेवारी समोर येत नव्हती. दरम्यान, आता आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था असलेल्या रॉयटर्सने पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा जाहीर केला आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४६ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती रॉयटर्सने पाकिस्तानी सैन्यातील एका प्रवक्त्याच्या हवाल्याने दिली आहे.
दरम्यान, पहलगाममधील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यांना लक्ष्य करत एअर स्ट्राईक केली होती. या हल्ल्यादरम्यान, मुरिदके, बहावलपूर पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद आदी ठिकाणचे दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात आले आहेत.