पलवल - पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून ९ दहशतवादी ठिकाणांवर टार्गेट हल्ला केला. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आले. भारतानं केलेल्या अचानक हल्ल्याने पाकिस्तान बिथरला. त्यानंतर सीमाभागात पाकिस्तानी सैन्याकडून सामान्य भारतीय नागरिकांवर गोळीबार सुरू झाला. यावेळी पाकिस्तानच्या गोळीबारात सैन्यातील लांस नायक दिनेश कुमार शहीद झाले. दिनेश सैन्याच्या ५ एफडी रेजिमेंटमध्ये तैनात होते.
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील मोहम्मदपूर गावातील लांस नायक दिनेश शर्मा यांच्या निधनाची बातमी येताच गावात शोककळा पसरली. शहीद दिनेश कुमार यांच्या वडिलांना मुलाच्या आठवणीत अश्रू अनावर झाले. त्यांच्या ५ मुलांपैकी तीन सैन्य दलात सेवा देत आहेत. दिनेश सर्वात मोठे होते. दिनेश कुमार यांचे २ भाऊ सैन्यात आहेत तर चुलक भाऊ मुकेश सैन्याच्या मेडिकल विंगमध्ये आहे. दिनेश कुमार शर्माच्या चुलत भावाने सांगितले की, दिनेश आर्टिलरी डिविजन ५ मध्ये तैनात होता. शत्रूंकडून झालेल्या गोळीबारात तो जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला असं त्यांनी म्हटलं.
तर २ दिवसांपूर्वी भावाशी बोलणे झाले होते. तेव्हा त्याने कुटुंबाची विचारपूस केली असं भाऊ पुष्पेंद्र याने सांगितले. जेव्हा दिनेश ऑपरेशनसाठी जात होता तेव्हा रात्री १०.३० वाजता त्याच्याशी बोलणे झाले. तो कोणत्या तरी ऑपरेशनसाठी जातोय असं म्हणाला अशी माहिती दिनेशचा मित्र प्रदीपने दिली. ऑपरेशनवेळी मोबाईल लाईटने समस्या येईल असं सांगत त्याने मी नंतर बोलतो असं दिनेशने प्रदीपला सांगितले. त्यानंतर दिनेशचा रात्री ३ वाजता कॉल आला होता परंतु तो उचलू शकलो नाही. त्यानंतर सकाळी ७ वाजता दिनेशला कॉल बॅक केला तेव्हा त्याच्या सहकाऱ्याने फोन उचलून तो जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती दिली असंही प्रदीपने सांगितले.
दरम्यान, मला माझ्या मुलावर गर्व आहे. त्याने देशाच्या रक्षणासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती दिली असं दिनेश कुमार यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली. दिनेशला ५ वर्षीय मुलगा दर्शन आणि ७ वर्षीय मुलगी काव्या अशी २ मुले आहेत. त्यांनाही देशसेवेसाठी पाठवणार असं शहीद दिनेश कुमार यांच्या वडिलांनी म्हटलं.