भारताने 'ऑपरेशन सिंदूर' आणि पाकिस्तानसोबतच्या तणावाबाबत तिन्ही सैन्यदलांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल महत्त्वाची माहिती दिली. "ऑपरेशन सिंदूरचं उद्दिष्ट फक्त दहशतवाद्यांचा खात्मा करणं आहे. आपण १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला" असल्याचं घई यांनी म्हटलं आहे. तसेच दहशतवाद्यांचे अड्डे उडवून दिल्याचे पुरावे दाखवले. दहशतवादी हल्ल्याला लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये मुदस्सर खार, हाफिज जमील आणि युसूफ अझहर असे तीन मोठे दहशतवादी मारले गेले आहेत.
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पहलगाममध्ये भारतीय नागरिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरची योजना आखण्यात आली होती. या कारवाईचे लष्करी उद्दिष्ट हे दहशतवादी आणि त्यांचे अड्डे नष्ट करणं होतं. आम्ही सीमेपलीकडील दहशतवादी तळांची सखोल ओळख पटवली. परंतु तेथील अनेक ठिकाणं आधीच रिकामी करण्यात आली होती, परंतु आम्हाला अशी ९ ठिकाणं आढळली जी आमच्या एजन्सींनी एक्टिव्ह असल्याचं सांगितलं."
"यातील काही ठिकाणं पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये होती आणि काही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात होती - जे मुरीदके, कसाब आणि डेव्हिड हेडली सारख्या दहशतवाद्यांशी संबंधित आहेत. हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले, ज्यात युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदस्सीर अहमद सारखे टार्गेट होते. हे दहशतवादी IC 814 हाइजॅक आणि पुलवामा हल्ल्यात सहभागी होते."