एका लग्नाची अजब गोष्ट! नवरी एक आणि वराती दोन; एकाच्या गळ्यात घातला हार, दुसऱ्यासोबत नांदायला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 09:06 IST2021-06-06T08:58:43+5:302021-06-06T09:06:19+5:30
One Bride And Two Groom Unique Marriage : एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली असून सर्वत्र याच लग्नाची चर्चा रंगली आहे.

एका लग्नाची अजब गोष्ट! नवरी एक आणि वराती दोन; एकाच्या गळ्यात घातला हार, दुसऱ्यासोबत नांदायला
नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. मात्र याच दरम्यान एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली असून सर्वत्र याच लग्नाची चर्चा रंगली आहे. उत्तर प्रदेशच्या एटामध्ये एक अजब घटना घडली आहे. नवरी एक आणि वराती दोन असं काहीसं पाहायला मिळालं आहे. लग्न मंडपात एकाच मुलीसोबत लग्न करण्यासाठी चक्क दोन वराती आल्या. त्यानंतर हैराण करणारी बाब म्हणजे नवरीने आधी आलेल्या नवरदेवाच्या गळ्यात हार घातला आणि नंतर आलेल्या नवरदेवासोबत सात फेरे घेऊन नांदायला गेली. या प्रकाराने वऱ्हाडी मात्र चांगलेच चक्रावून गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील सिरांव या गावात ही अजब घटना घडली आहे. सिरांवमध्ये एक नवरदेव वरात घेऊन नवरीच्या घरी आला. त्यामुळे नवरीने नवरदेवाच्या गळ्यात हार घातला. त्यानंतर काही वेळाने तिच्या घरी दुसरी वरात आली. तेव्हा नवरीने ज्याच्या गळ्यात हार घातला तो नवरदेव वयाने मोठा असल्याचं सांगून त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर दुसऱ्या नवरदेवाबरोबर सात फेरे घेतले आणि त्याच्याबरोबर नांदायला गेली. यामुळे आधी आलेली वऱ्हाडी मंडळी संतप्त झाली आणि त्यांनी गोंधळ घातला.
मुलाकडच्यांनी नवरी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी मुलीचे वडील आणि काका यांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात आहे. सिरांव गावातील या लग्नाची सध्या सर्वत्रच जोरदार चर्चा रंगली आहे. एकाच्या गळ्यात हार आणि दुसऱ्यासोबत सात फेरे या प्रकार झाल्याने लग्न मंडपात गोंधळ निर्माण झाला होता. नाराज झालेल्या एका नवरदेवाच्या कुटुंबाने नवरीविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.