अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:26 IST2025-10-09T09:24:42+5:302025-10-09T09:26:17+5:30
चितेवर कायमची शांत झोपलेल्या आदित्रीचा वाढदिवस साजरा करताना प्रत्येकाचे डोळे भरून आले.

अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
छत्तीसगडच्या कवर्धा येथे अत्यंत हृदयस्पर्शी अशी घटना घडली आहे, जी पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल. याठिकाणी एका वडिलांनी मुलीच्या अंत्यसंस्काराला तिचा वाढदिवस साजरा करून तिला निरोप दिला. काही दिवसांपूर्वी कवर्धा जिल्ह्यातील चिल्फी येथे भीषण रस्ते अपघात घडला. कोलकाता येथे राहणाऱ्या एका कुटुंबाच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. हे कुटुंब कान्हा नॅशनल पार्क फिरायला गेले होते. संध्याकाळी बिलासपूरहून कोलकाताला जाण्यासाठी त्यांची ट्रेन होती परंतु रस्त्यात झालेल्या अपघाताने सर्वकाही बदललं.
हा अपघात इतका भीषण होता की, जागेवरच ५ जणांचा मृत्यू झाला. ज्यात छोटी मुलगी आदित्री आणि तिच्या आईचा समावेश होता. कवर्धा येथे आदित्री आणि तिच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र ज्यादिवशी अंत्यसंस्कार होते त्याच दिवशी चिमुकल्या आदित्रीचा वाढदिवस आहे असं तिच्या वडिलांनी सांगितले तेव्हा तिथे उपस्थित असणारा प्रत्येकजण सुन्न झाला. मुलीच्या वाढदिवशी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ तिच्या वडिलांवर आली होती. तेव्हा तिचा वाढदिवस साजरा करून तिला निरोप देण्याची वडिलांची इच्छा होती. मग अंत्यसंस्काराच्या ठिकाणी हजर असलेल्या लोकांनी फुग्यांनी सजावट केली. केक आणला, आदित्रीला वाढदिवसानिमित्त टोपी घातली आणि सेलिब्रेशन करण्यात आले.
चितेवर कायमची शांत झोपलेल्या आदित्रीचा वाढदिवस साजरा करताना प्रत्येकाचे डोळे भरून आले. एकीकडे मुलीच्या वाढदिवशी तिच्या चितेला अग्नी देण्याचं दु:ख तर दुसरीकडे आयुष्यभराची सोबती या दोघींना निरोप देण्याचं संकट वडिलांवर होते. त्यांनी त्याच्या मुलीला शेवटच्या वाढदिवसाची भेट दिली. हा भावनिक क्षण कवर्धाचे लोक कधीही विसरणार नाहीत.
काय घडलं होते?
चिल्फी रोडवर बोलेरो आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली होती. या दुर्घटनेत ५ लोकांचा मृत्यू झाला. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की या कारचा चेंदामेंदा झाला. मृतांमध्ये ३ महिला, १ पुरूष आणि १ लहान मुलीचा समावेश होता. तर ५ जण गंभीर जखमी होते. कारमधील लोक मध्य प्रदेशातील पर्यटनस्थळ पाहायला आले होते. मात्र हा त्यांचा शेवटचा प्रवास ठरला.