"दोन-तीन महिन्यांत तेल आणि खतांचा साठा संपणार...!"; अमेरिका-इराण युद्धावरून माजी RAW प्रमुखांचा गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:55 IST2026-03-31T15:53:46+5:302026-03-31T15:55:05+5:30
दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू म्हणजे एक प्रकारची 'हत्या' आहे. हे कृत्य आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे, असेही ते म्हणाले.

"दोन-तीन महिन्यांत तेल आणि खतांचा साठा संपणार...!"; अमेरिका-इराण युद्धावरून माजी RAW प्रमुखांचा गंभीर इशारा
अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या चार आठवड्यांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे भारतासमोर मोठी आव्हाने उभी राहू शकतात, असा गंभीर इशारा 'रॉ'चे (RAW) माजी प्रमुख विक्रम सूद यांनी दिला आहे. एएनआयसोबत बोलताना सूद म्हणाले, "2 ते 3 महिन्यांत आव्हाने जाणवतील, जेव्हा आपल्याकडचे तेल आणि खते (फर्टिलायझर्जस) संपतील. भारताला मिळणारा बहुतांश एलएनजी (LNG) पुरवठा कतारमधून, तर कच्च्या तेलाचा पुरवठा सौदी अरेबिया आणि मध्यपूर्वेतील देशांतून होतो. जर हा पुरवठा खंडित झाला किंवा चढ्या दराने मिळाला, तर देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढेल. हे संकट हाताळणे सरकारसाठी मोठे आव्हान ठरेल.
दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू म्हणजे एक प्रकारची 'हत्या' आहे. हे कृत्य आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे, असेही ते म्हणाले.
भारतासाठी होर्मुजची सामुद्रधुनी महत्वाची -
भारताचे इस्रायलसोबत मैत्रीचे आणि सुरक्षेच्या दृष्टीने जवळचे संबंध आहेत. मात्र असे असले तरी, इराणवर होणारे हल्ले दुर्दैवी आहेत. ते पुढे म्हणाले, "भारत इराणवर नाही, तर 'होर्मुजच्या सामुद्रधुनीवर' (Strait of Hormuz) अवलंबून आहे. हा मार्ग बंद झाल्यास भारताच्या तेल आयातीवर मोठा परिणाम होईल." हे संकट इराणने किंवा भारताने स्वतःहून ओढवून घेतलेले नाही तर, इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे भारतावर लादले गेले आहे," असेही ते म्हणाले.
अमेरिकेने या संघर्षात सामील होणे हे एका देशाविरुद्ध 'अघोषित युद्ध' पुकारण्यासारखे आहे, अशी टीकाही त्यांनी केली. अमेरिका आणि इस्रायलला सुरुवातीपासूनच इराणची शक्ती ओळखण्यात अपयश आले. इराण या परिस्थितीचा खंबीरपणे सामना करत असून, हे युद्ध म्हणजे इराणला पूर्णपणे संपवून या क्षेत्राची कमान इस्रायलच्या हाती देण्याचा डाव आहे का, हे केवळ काळच ठरवेल, असे सूद यांनी म्हटले आहे.