धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 10:33 IST2025-10-03T10:19:19+5:302025-10-03T10:33:29+5:30
राजस्थानमधील जयपूरमध्ये एटीएसने एका माजी एनएसजी कमांडोला गांजा तस्करी प्रकरणी अटक केली.

धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये झालेल्या दहशतवाद विरोधी कारवाईत एनएसजी कमांडोने महत्वाची भूमिका बजावली आहे. या कारवाईमध्ये सहभागी असलेल्या एका माजी एनएसजी कमांडोला पोलिसांनी गांजा तस्करी प्रकरणी अटक केली.
राजस्थान एटीएसने ही कारवाई केली. माजी एनएसजी कमांडो बजरंग सिंह याला अटक केली आहे. बजरंग तेलंगणा आणि ओडिशातून गांजाची तस्करी करून राजस्थानच्या विविध भागात त्याचा पुरवठा करायचा. त्याच्यावर २५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
एटीएसने असे घेतले ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, बजरंग सिंह हा मूळचा सीकर जिल्ह्यातील फतेहपूरचा रहिवासी आहे. एटीएस गेल्या दोन महिन्यांपासून बजरंगचा शोध घेत होते. बुधवारी पोलिसांना बजरंग चुरू जिल्ह्यातील रतनगढ येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एटीएसने सापळा रचून त्याला अटक केली.
यापूर्वीही अटक झाली होती
बजरंगला २०२३ मध्ये हैदराबादमध्ये १०० किलो गांजाची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती, पण नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
"बजरंगने ग्रॅमपासून क्विंटल पर्यंत गांजाच्या तस्करीकडे वाटचाल केली. ही अटक सध्या सुरू असलेल्या ड्रग्ज विरोधी मोहिमेतील एक मोठे यश आहे, यामुळे राजस्थानमधील गांजाच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त होण्यास मदत होईल. बजरंग सिंह याने बीएसएफमध्ये सामील होण्यासाठी आपले शिक्षण सोडले. तो भरती झाला, त्यानंतर कुस्तीगीरासारख्या शरीरयष्टी आणि लढाऊ वृत्तीमुळे तो एनएसजी कमांडो बनला.
बजरंगने दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बजरंगने सात वर्षे दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. २००८ मध्ये २६/११ च्या मुंबई हल्ल्यादरम्यान ताज हॉटेल ऑपरेशनमध्ये सहभागी होता. २०२१ मध्ये निवृत्त झाल्यानंतर तो गुन्हेगारीकडे वळला. त्याच्या गावात परतल्यानंतर, त्याने राजकारणात जाण्याचा प्रयत्न केला.