आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 06:08 IST2025-10-04T06:08:28+5:302025-10-04T06:08:51+5:30
वाढते प्रदूषण, इंधनाचे प्रचंड दर आणि इलेक्ट्रिक वाहनांची मागणी लक्षात घेऊन भोपाळ येथील विद्यार्थ्यांनी एक नवा प्रयोग साकारला आहे.

आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
भोपाळ : वाढते प्रदूषण, इंधनाचे प्रचंड दर आणि इलेक्ट्रिक वाहनांची मागणी लक्षात घेऊन भोपाळ येथील विद्यार्थ्यांनी एक नवा प्रयोग साकारला आहे. मॅनेजमेंट अँड सायन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयएसटी) विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणाऱ्या ‘ई-बुलेट’ या वाहनाची निर्मिती केली आहे.
‘ई-बुलेट’वर सोलर पॅनल बसवले असून, सौरऊर्जा बॅटरीमध्ये साठवली जाते. या बॅटरीमधील ऊर्जेवर वाहन चालते. तसेच, या वाहनासाठी कंट्रोलर युनिट, लिथियम-आयर्न बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आला आहे. सध्या तीनचाकी वाहनांवरच सोलर पॅनल बसविण्यात येत आहे.
वाहनक्षेत्रात मोठी क्रांती
स्टुडंट्स वेल्फेअर विभागाचे डीन प्रा. शैलेंद्र जैन यांनी सांगितले की, ई-बुलेटचा प्रयोग यशस्वी ठरल्यास वाहनक्षेत्रात मोठी क्रांती होऊ शकते. त्यामुळे वाहनक्षेत्रात सौरऊर्जेचा वापर वाढू शकेल.
नेमके काय होते?
सोलर पॅनल : वाहनावर लावलेली पॅनल वीज तयार करतात.
कंट्रोलर युनिट : सोलर ऊर्जेची योग्यरीत्या साठवणूक करून ती बॅटरीत पाठवते.
लिथियम-आयर्न बॅटरी : ऊर्जा साठवून गरजेनुसार वाहनाला पुरवते.
इलेक्ट्रिक मोटर : बॅटरीतील ऊर्जेच्या साहाय्याने वाहनाला गती देते.
असे आहेत सौरऊर्जेचे आणखी फायदे
सौरऊर्जेमुळे वाहन चालवण्यासाठी पेट्रोल, डिझेल किंवा विजेवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होईल. विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांना त्याचा अधिक फायदा आहे. सोलर चार्जिंगमुळे इलेक्ट्रिकल चार्जिंगवरील खर्च वाचतो.
पॅनलमध्ये मोठे यांत्रिक भाग नसल्याने देखभाल कमी लागते. ही पॅनल २० ते २५ वर्षांपर्यंत कार्यक्षम राहू शकतात. जिथे वीज उपलब्ध नाही अशा ग्रामीण किंवा डोंगराळ भागांत सौरऊर्जेचा वापर वाहनासाठी करता येईल.
सोलार पॅनलद्वारे एसी, रेडिओ, लाइट्स, कूलिंग फॅन्स यांसारख्या सप्लिमेंटरी सिस्टम्सना ऊर्जा पुरविता येते. यात सुरुवातीचा खर्च जास्त असला तरी आगामी काळात खर्चात मोठी बचत होते.