"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:15 IST2025-11-14T12:15:01+5:302025-11-14T12:15:28+5:30
"...या अर्थाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाचा विचार करता, त्यांच्या काळातील काँग्रेस मध्यममार्गी होती. त्या काळात काँग्रेसने पूर्वीच्या भाजप सरकारकडून काही धोरणांचा स्वीकार केला होता."

"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार शशी थरूर यांनी गुरुवारी मोठे विधान केले. एका कार्यक्रमात बोलताना, अलीकडच्या काही वर्षांत काँग्रेस पक्ष पूर्वीपेक्षाही अधिक डाव्या विचारसरणीचा बनला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामागील कारण सांगताना थरूर म्हणाले, भाजपच्या "विभाजनकारी राजकारणाचा" सामना करण्याचा प्रयत्न करत असल्याने काँग्रेस पक्ष अधिक डाव्या विचारसरणीचा झाला आहे.
भाजपच्या राजकारणा विरोधात काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे जवळ येणे हे ‘रॅडिकल सेंट्रिझम’चे उदाहरण म्हणावे का? अशा आशयाचा प्रश्न केला असता थरूर म्हणाले, त्यांचा विचार व्यवहारिक राजकारणावर नाही, तर सिद्धांत आणि विचारधारेवर केंद्रित होते. याआधी त्यांनी ‘रॅडिकल सेंट्रिझम’वर व्याख्यानही दिले होते.
थरूर म्हणाले, धोरणात्मक बदल वाढत आहेत. याचा एक परिणाम म्हणजे, माझा पक्ष पूर्वीपेक्षाही अधिक डाव्या विचारसरणीचा झाला आहे. या अर्थाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाचा विचार करता, त्यांच्या काळातील काँग्रेस मध्यममार्गी होती. त्या काळात काँग्रेसने पूर्वीच्या भाजप सरकारकडून काही धोरणांचा स्वीकार केला होता.
थरूर यांनी आठवण करून दिली की, काँग्रेसने 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेतृत्वात काही धोरणे राबवण्यात आली होती. याचे भाजपनेही पुढे सत्तेत आल्यानंतर अनुसरण केले होते. ते पुढे म्हणाले की, 1991 ते 2009 दरम्यान एक मध्यमार्गी काळ होता. मात्र, तो नंतर बदलायला सुरुवात झाली.
थरूर पुढे म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून विरोधीपक्षात राहिल्याने काँग्रेस पक्ष आधीच्या तुलनेत अधिक डाव्या विचारसरणीचा झाला आहे. हे धोरणात्मक बदल आहेत की तात्विक विश्वास, हे भविष्यात ठरेल.