पालिकेचाच नाही कर्मचा-यांवर अंकुश
By Admin | Updated: June 5, 2015 00:05 IST2015-06-05T00:05:12+5:302015-06-05T00:05:12+5:30

पालिकेचाच नाही कर्मचा-यांवर अंकुश
> कालव्याजवळ कचरा टाकण्याचा प्रकार उघड पुणे : नदीपात्रात कचरा टाकल्याने एका सोसायटीस पाच हजार रुपये दंड करणा-या महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला स्वत:ला मात्र या नियमांची तमा नसल्याचे आज स्पष्ट झाले. धायरीतून वाहणा-या कालव्याजवळ कचरा टाकणा-या पालिका कर्मचा-यास स्थानिक नागरिकांनी हटकल्यावर त्याने थातुरमातुर कारण सांगत नंतर कच-याचा टेंपो घेऊन पोबारा केला.आज पर्यावरणदिनाच्या दिवशीच सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार झाला. गारमाळ भागातून वाहणा-या कालव्याच्या भरावावर टेंपो थांबवून कचरा टाकला जात होता. या कालव्याच्या भागात पलिकडील तीरावर आंबेडकर नगर झोपडपट्टी आहे. पिवळया रंगाच्या टेंपोतून कचरा टाकणा-या ड्रायव्हरला स्थानिक कार्यकर्ते रमेश खेडेकर यांनी पाहिले. भरावाखाली टाकला जाणारा कचरा वा-यामुळे उडून पाण्यात पडत असल्याचे पाहून खेडेकर यांनी संबंधितास मनाई केली. त्यावर सुका कचरा टाकत असल्याचे या व्यक्तीने सांगून टेंपो सुरु करुन पोबारा केला. पिवळ्या रंगाचा हा टेंपो पालिकेच्या धायरी फाटा कोठीवर नेहमी उभा असतो. या प्रकाराबाबत महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी श्री. कांबळे यांना विचारले असता त्यांना समाधानकारक खुलासा करता आला नाही. काही दिवसांपुर्वी सिंहगड रस्त्यावरील सनसिटीमधील सोसायटीला नदीपात्रात कचरा टाकल्याबद्द्ल पाच हजार रुपये दंड केला होता. महानगरपालिकेचे कर्मचारीच पिण्याच्या पाण्याजवळ कचरा टाकत असल्याचे पर्यावरण दिनाच्या पार्श्वभुमीवर दिसून आले असून महानगर पालिकेवर कोण कारवाई करणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. धायरी फाटा भागातील कालव्याजवळ असलेल्या काही सोसायट्या व झोपडपट्टीतून थेट पाण्यात कचरा फेकला जात असल्याचे वृत्त लोकमतने यापुर्वी छायाचित्रासह प्रसिध्द केल्यानंतर स्थानिक वॉर्ड प्रशासनाने कारवाई केल्याने हे प्रकार कमी झाले होते, आज पालिकेच्याच कर्मचा-याने या भागात कचरा फेकल्याचे दिसून आल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला.