म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 10:12 IST2025-10-07T10:12:37+5:302025-10-07T10:12:53+5:30
बार काउंसिल ऑफ इंडियाने (बीसीआय) या घटनेची गंभीर दखल घेत राकेश किशोर यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे...

म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
सुप्रीम कोर्टात सोमवारी एक धक्कादायक प्रकार घडला. वकील राकेश किशोर यांनी भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (६ ऑक्टोबर) सकाळी ११:३५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घढला. खजुराहो येथील एका मंदिरातील भगवान विष्णू यांची खंडीत मूर्ती व्यवस्थित करण्यासंदर्भातील एका याचिकेवर सीजेआय गवई सुनावणी करत असतानाच हा प्रकार घडला. दरम्यान, सुरक्षारक्षकांनी तात्काळ कारवाई करत राकेश किशोर यांना ताब्यात घेतले.
काय म्हणाले राकेश किशोर?
हिन्दुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांनी, या कृत्यासंदर्भात आपल्याला कसलाही पश्चात्ताप नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “मला एका दैवी शक्तीने असे करण्यास सांगितले होते. मी जेलमध्ये गेलो असतो तर बरे झाले असते. माझे कुटुंबयही माझ्या या कृत्यामुळे नाराज आहेत. त्यांना समजत नाहीये.” त्यांच्या या विधानाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
बार काउंसिलकडून निलंबित -
बार काउंसिल ऑफ इंडियाने (बीसीआय) या घटनेची गंभीर दखल घेत राकेश किशोर यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. बीसीआयचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अधिवक्ता मनन कुमार मिश्रा यांनी जारी केलेल्या अंतरिम निलंबन आदेशात म्हटले आहे की, राकेश किशोर यांचे हे कृत्य न्यायालयाच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. तसेच हे अधिवक्त्यांच्या आचारसंहितेचा आणि अधिवक्ता अधिनियमाच्या, १९६१ च्या नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे.
निलंबनाच्या कालावधीत राकेश किशोर यांना कोणत्याही न्यायालय, प्राधिकरण किंवा अधिकरणात हजर राहता येणार नाही. त्यांच्याविरुद्ध अनुशासनात्मक कारवाई देखील सुरू करण्यात येणार आहे.