गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 08:37 IST2025-05-13T08:37:05+5:302025-05-13T08:37:54+5:30
रविवारी भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानला एक हॉटलाईन मेसेज पाठवला. ज्यात त्यांच्याकडून झालेल्या सीजफायर उल्लंघनाबाबत कठोर इशारा दिला.

गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
नवी दिल्ली - भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी ५ वाजता या दोन्ही देशातील DGMO (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स) यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही बाजूने एकही गोळी चालवली जाणार नाही अथवा एकमेकांविरोधात कुठलेही आक्रमक अथवा शत्रुतापूर्ण कारवाई होणार नाही यावर सहमती झाली. त्याशिवाय दोन्ही देशांनी सीमेवरील सैनिकांची संख्या कमी करण्याबाबत तात्काळ उपायांवर विचार करतील यावरही चर्चा करण्यात आली. सोमवारी दुपारी १२ वाजता होणारी ही चर्चा काही कारणास्तव संध्याकाळी ५ वाजता झाली.
९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त
भारताने ६ मे च्या मध्यरात्री १ च्या सुमारास ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. ज्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी ठिकाणांवर टार्गेट हल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला. शनिवारी १० मे रोजी दोन्ही देशांकडून युद्धविराम करण्याची घोषणा करण्यात आली.
३५-४० पाकिस्तानी सैन्य मारले
सोमवारच्या सैन्य पत्रकार परिषदेत लेफ्टिनंट जनरल राजीव घई यांनी लढाईत पाकिस्तानचे ३५-४० सैनिक मारले गेले. आम्ही अचूक हल्ले केले. भारताने पाकिस्तानातील सैन्य ठिकाणांवर हल्ले केले. पाकिस्तानची एअर डिफेन्स यंत्रणाही उद्ध्वस्त केली. आवश्यकता भासल्यास भारतीय सैन्य कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे असं सैन्याकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, शनिवारी युद्धविराम झाल्यानंतर काही तासांनी पाकिस्तानकडून पुन्हा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यावरही भारतीय सैन्याने माध्यमांना उत्तर दिले. रविवारी भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानला एक हॉटलाईन मेसेज पाठवला. ज्यात त्यांच्याकडून झालेल्या सीजफायर उल्लंघनाबाबत कठोर इशारा दिला. जर यापुढे पुन्हा असं घडले तर भारत चोख प्रत्युत्तर देईल. आतापर्यंत आम्ही खूप संयम राखला आहे. आमची कारवाई केंद्रीत आहे. जर आमच्या नागरिकांच्या जीवाला, देशाच्या अखंडतेला आणि सुरक्षेला कुठलाही धोका होणार असेल तर त्याला पूर्ण ताकदीने उत्तर दिले जाईल असं भारतीय सैन्याने म्हटलं आहे.