नितीश कुमार यांनी मोदींसाठी व्हाईट बोर्डवर लिहिला खास संदेश, चर्चांना उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 11:29 PM2021-09-17T23:29:49+5:302021-09-17T23:31:20+5:30

Nitish Kumar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन आज देशातील राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होता. दरम्यान, मोदींच्या जन्मदिनी एक फोटो खूप चर्चेत राहिला. या फोटोचे बिहारच्या राजकारणामध्ये राजकीय अर्थ शोधले जात आहेत.

Nitish Kumar wrote a special message for Modi on the White Board, sparking discussions | नितीश कुमार यांनी मोदींसाठी व्हाईट बोर्डवर लिहिला खास संदेश, चर्चांना उधाण 

नितीश कुमार यांनी मोदींसाठी व्हाईट बोर्डवर लिहिला खास संदेश, चर्चांना उधाण 

googlenewsNext

पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन आज देशातील राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होता. दरम्यान, मोदींच्या जन्मदिनी एक फोटो खूप चर्चेत राहिला. या फोटोचे बिहारच्याराजकारणामध्ये राजकीय अर्थ शोधले जात आहेत. एकीकडे बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयूच्या संबंधांबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मोदींच्या जन्मदिनानिमित्त नितीश कुमार यांनी व्हाईट बोर्डवर आपल्या हातांनी शुभेच्छा लिहिल्या. नितीश कुमार यांनी आधी ट्विट करून मोदींना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतरही त्यांनी खास व्हाईट बोर्डवरून शुभेच्छा दिल्याने त्यातून त्यांनी सुचक संकेत दिल्याचे सांगण्यात येत आहे. (Nitish Kumar wrote a special message for Modi on the White Board, sparking discussions)

गेल्या काही दिवसांमध्ये विविध मुद्द्यांवरून भाजपा आणि जेडीयूमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. त्यातच नितीश कुमार पुन्हा एकदा मोदीविरोधी गटाशी हातमिळवणी करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्या पार्श्वभूमीवर नितिश कुमार यांनी या शुभेच्छा दिल्याने या सर्व शक्यतांना पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे. 

२०१७ मध्ये फेब्रुवारी महिन्यात बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार असताना नितीश कुमार यांनी पाटणामधील एका कार्यक्रमात एका व्हाईट पेंटिंगमध्ये रंगकाम केले होते. त्यामधील कमळ त्यांनी रंगवले होते. त्यानंतर बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. तसेच नितीश कुमार यांनी भाजपासोबत पुन्हा हातमिळवणी करत राज्यात एनडीएचे सरकार स्थापन केले होते. दरम्यान, आजच्या संदेशामधून नितीश कुमार यांनी मोदी आणि भाजपासोबत चांगले संबंध कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे.

नितीश कुमार यांनी मोदी आणि भाजपाशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याची सुरुवात काही दिवसांआधीच केली होती. त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जेडीयू सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच हरियाणामध्ये चौधरी देविलाल यांच्या जयंतीला निमंत्रण असूनही उपस्थित राहणे टाळले होते.

दरम्यान, नितीश कुमार यांच्या या शुभेच्छा संदेशावर राजदने खोचक टीका केली आहे. नितीश कुमार हे गुजरातमधील परिस्थिती पाहून घाबरले आहेत. तिथे भाजपाने सर्व सरकारच बदलले आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपाशी आणि मोदींशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे, असा टोला राजदचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी लगावला आहे.  

Web Title: Nitish Kumar wrote a special message for Modi on the White Board, sparking discussions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.