केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी (१४ जुलै) कर्नाटकातील शिवमोगा येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात लांब केबल-स्टेड सिंगदूर पुलाचे उद्घाटन केले. हा भव्य पूल कर्नाटकातील सागर तालुक्यातील अंबरगोडलू आणि कलासवल्ली गावांना जोडणाऱ्या शरावती बॅकवॉटरवर बांधला गेला आहे. मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर या विशाल पुलाचे फोटो शेअर केले. यासोबतच ते म्हणाले, "आज कर्नाटकातील शिवमोगा येथे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात लांब केबल-स्टेड ६ किमी लांबीच्या शरावती पुलाचे उद्घाटन केले."
४७२ कोटी रुपयांचा पूल
४७२ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पुलामुळे सागर आणि होसनगरा तालुक्यातील अनेक गावांना जोडणी मिळेल, तसेच सिगंदूर चौडेश्वरी आणि कोल्लूर मुकांबिका मंदिर यासारख्या प्रमुख तीर्थस्थळांपर्यंत पोहोचणे सुलभ होईल, असे गडकरी म्हणाले. बहुप्रतिक्षित प्रकल्पामुळे दशकांपूर्वीचे आव्हान दूर होईल, वाहतूक सुलभ होईल, प्रादेशिक आर्थिक गोष्टींना चालना मिळेल आणि संपूर्ण प्रदेशात गतिशीलता लक्षणीयरित्या सुधारेल, असेही ते म्हणाले.
गडकरींकडून लोकार्पण, काँग्रेसचे मुख्यमंत्री नाखुश
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली आणि सांगितले की त्यांना उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी कोणतेही निमंत्रण पाठवण्यात आले नव्हते. अलिकडेच सिद्धरामय्या यांनी गडकरींना उद्घाटन समारंभाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती. आता त्यांनी असा दावा केला आहे की त्यांना या उद्घाटन समारंभाला आमंत्रित करण्यात आले नव्हते. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ते म्हणाले की, 'आमच्यापैकी कोणीही या कार्यक्रमात सहभागी होणार नाही. आम्हाला आमंत्रण मिळालेले नाही. कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलण्यासाठी मी नितीन गडकरींशी फोनवरून बोललो होतो. त्यांनी त्यावर विचार करण्याचे आश्वासनही दिले होते, परंतु कदाचित भाजप नेत्यांनी त्यांच्यावर दबाव आणला असेल आणि त्यांनी आम्हाला न कळवता सिंगदूर पुलाचे उद्घाटन केले असेल. माझा दुसरीकडे नियोजित कार्यक्रम होता. त्यामुळे मी उद्घाटनाला गेलो नाही.'
दरम्यान, नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले की ११ जुलै २०२५ रोजीच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पुलाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले होते.