Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 07:10 IST2025-06-19T07:09:04+5:302025-06-19T07:10:19+5:30

National Highways Toll Pass: प्रवास अधिक स्वस्त, जलद; कार, जीप, व्हॅनसाठी मिळणार सुविधा, २०० वेळा करता येणार वापर

Nitin Gadkari Govt announces Rs 3000 annual toll pass on NHs | Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?

Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?

नवी दिल्ली: कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या बिगरव्यावसायिक वाहनांसाठी ३ हजार रुपयांत फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केली. या पासद्वारे राष्ट्रीय महामार्गावरून संपूर्ण देशात प्रवास करता येऊ शकेल. तीन हजार रूपये खर्च करून ७ हजार रूपयाचा टोल वाचविता येईल अशी योजना गडकरी यांनी आणली आहे. १५ ऑगस्टपासून हा पास सुरू होईल. याची मुदत १ वर्ष किंवा २०० खेपा यांपैकी जे आधी पूर्ण होईल, तेवढी असेल. या पासमुळे राष्ट्रीय महामार्गावर केवळ १५ रुपये एवढाच टोलखर्च सामान्यांना येईल.

पास कुठे मिळेल, आधीच्या फास्टॅगचे काय? वार्षिक पासविषयी तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे...

वार्षिक पास कुठे खरेदी करू शकतो?
राजमार्ग यात्रा मोबाइल अॅप आणि एनएचएआयच्या अधिकृत वेबसाइटवर. 

वार्षिक पास कसा चालू होईल ?
फास्टॅग आणि संबंधित वाहनाची पात्रता तपासल्यानंतर सक्रिय केला जाईल. यानंतर वापरकर्त्याला राजमार्ग यात्रा अॅप किंवा एनएचएआय वेबसाइटवर ३ हजार रुपये ऑनलाईन पेमेंट करावा लागेल. त्यानंतर पास सुरू होईल.

माझ्याकडे आधीपासून फास्टॅग असल्यास, नवीन घ्यावा लागेल का? 
नाही, सध्याच्या फास्टॅगवरच पास मिळेल.

हा पास कोणत्या टोलवर चालेल?
फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगतीमार्गावरील टोल नाक्यांवर लागू होतो. राज्य महामार्ग किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालवले जाणारे टोल नाके यावर पास लागू होणार नाही. अशा ठिकाणी फास्टॅग नियमित टोलप्रमाणेच असेल.

पास सर्व वाहनांसाठी आहे का?
नाही. हा पास फक्त खासगी, बिगरव्यावसायिक कार/जीप/व्हॅन यांच्यासाठी आहे. व्यावसायिक वाहनात वापर झाल्यास पास त्वरित निष्क्रिय केला जाईल.

मी हा पास दुसऱ्या वाहनावर वापरू शकतो का?
नाही. या पासचे हस्तांतर करता येणार नाही. केवळ संबंधित फास्टेंग असलेल्या नोंदणीकृत वाहनावरच वैध आहे.

फास्टॅग गाडीच्या समोरील काचेला लावणे आवश्यक आहे का?
होय. काचेला योग्यरित्या लावलेल्या फास्टॅगवरच पास सक्रिय केला जाईल. जर माझा फास्टंग फक्त चेसिस नंबरवर नोंदणीकृत असेल तर काय? तर पास मिळणार नाही. पाससाठी वैध वाहन नोंदणी क्रमांक आवश्यक आहे.

२०० टोल कसे मोजणार?
पॉइंट-आधारित टोल नाके: एका टोल नाक्यावरून गेले की एक प्रवास मानला जाईल. पुढे-पाठीमागे (राउंड ट्रिप) केल्यास दोन प्रवास समजले जातील. क्लोज्ड टोलिंग प्रणाली: एक प्रवेश व एक निर्गम (एंट्री एक्झिट) म्हणजे एक प्रवास मानला जाईल.

पासबाबत एसएमएस येईल का?
होय. पास सक्रिय करताना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएस येईल. वर्ष संपण्याआधी २०० टोल झाल्यास ? वर्ष संपण्याआधी २०० टोल झाल्यानंतर पुन्हा २०० टोलसाठी किंवा वर्षभरासाठी पास खरेदी करू शकता.

स्टेट हायवे, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे येथे हा वार्षिक पास चालेल का?
नाही. दोन्ही मार्ग राष्ट्रीय महामार्ग नाहीत. त्यामुळे तिथे हा पास चालणार नाही. पण जुना मुंबई-पुणे हाय-वे हा राष्ट्रीय महामार्ग आहे. तिथे हा पास चालेल. स्टेट हाय-वेवर हा पास चालणार नाही.

नितीन गडकरी काय म्हणाले?
"एका नाक्यावर सरासरी ५० रुपये द्यावे लागत असतील आणि २०० वेळा टोल भरावा लागला तर त्याची किंमत १०,००० रुपये होते. आता यातील वर्षाकाठी सात हजार रुपयाची बचत होईल", असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी म्हणाले.

Web Title: Nitin Gadkari Govt announces Rs 3000 annual toll pass on NHs