पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, ब्रह्मोस माजी इंजिनियरची तब्बल सात वर्षानंतर निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 13:58 IST2025-12-04T13:57:29+5:302025-12-04T13:58:05+5:30
Brahmos Engineer Nishant Agarwal Acquitted: पाकिस्तानी एजंटशी भारतीय क्षेपणास्त्राची गुपिते शेअर केल्याचा आरोप त्याच्यावर होता

पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, ब्रह्मोस माजी इंजिनियरची तब्बल सात वर्षानंतर निर्दोष मुक्तता
Brahmos Engineer Nishant Agarwal Acquitted: ब्रह्मोस मिसाईल सेंटरमध्ये काम करणारा पुरस्कार विजेता शास्त्रज्ञ निशांत अग्रवाल याच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप होता. अखेर सात वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याला हेरगिरीच्या आरोपातून मुक्त केले. निशांत अग्रवालने सात वर्षे तुरुंगात घालवली. संपूर्ण चौकशी न करता परदेशात नोकरी करण्याची चूक त्याला महागात पडली. पाकिस्तानी एजंटशी भारतीय क्षेपणास्त्राची गुपिते शेअर केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. त्याबाबत खटला सुरू होता. अखेर सात वर्षांनी त्याची आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.
अखेर मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे. तुरुंग प्रशासन निष्पक्ष होते; तक्रार करण्यासारखे काहीही नाही. मी आयुष्य नव्याने सुरू करेन, कारण मी आयुष्यभर एक लढाऊ योद्ध्याप्रमाणे झुंजत राहिलो आहे होता, अशी प्रतिक्रिया निशांत अग्रवालने दिली. निशांत अग्रवालला २०१८ मध्ये अधिकृत गुपिते कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली अटक करण्यात आली होती. ३४ वर्षीय निशांत अग्रवालला २०१७-१८ चा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार मिळाला होता. परंतु हेरगिरीच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली.
सेजल कपूर नावाच्या एका महिलेने लिंक्ड-इनवर निशांत अग्रवालशी संपर्क साधला. सेजल कपूरने निशांत अग्रवालशी गप्पा गोष्टी करायला सुरुवात केली. २०१७ मध्ये त्यांनी चार दिवस गप्पा मारल्या. तपासणीदरम्यान, हे चॅट्स तपासत असताना पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की १९ डिसेंबर रोजी कपूरने यूकेमधील नोकरीबद्दल त्याला माहिती दिली, ज्यासाठी निशांत अग्रवालने इच्छा व्यक्त केली होती. पुढील तपासादरम्यान, उच्च न्यायालयाला असे आढळून आले की कपूरने अग्रवालला एका यूके कंपनीच्या मॅनेजरच्या मुलाखतीसाठी आमंत्रित केले होते आणि त्यासाठी एक विशिष्ट सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगितले होते, ज्यात व्हायरल होता आणि सारेकाही तिथूनच सुरु झाले.
तपास अधिकाऱ्याने न्यायालयासमोर स्पष्ट केले की अग्रवालने लिंक्डइन प्लॅटफॉर्मवर कोणतेही विभागीय कागदपत्रे पाठवली नाहीत किंवा अपलोड केलेली नाहीत. आदेशात म्हटले आहे की, लिंक्डइन वापरण्यास मनाई करणारे ब्रह्मोसचे कोणतेही परिपत्रक नाही किंवा कर्मचाऱ्यांना नोकरी शोधण्यावर कोणतेही बंधन नाही. सादर केलेल्या सर्व पुराव्यांची तपासणी केल्यानंतरही बराच काळ अग्रवालच्या वकिलांना त्याला सोडवण्यात अपयश आले होते. पण अखेर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाने 'मोठी चूक' केली असे सांगत त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.