भारतीय तरुणीची अमेरिकेत निर्घृण हत्या; इंटरपोलने तामिळनाडूतून एक्स-बॉयफ्रेंडला घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 14:56 IST2026-01-05T14:53:51+5:302026-01-05T14:56:39+5:30
Nikita Godishala Murder Case: आरोपीने स्वतः पोलिसांत निकिता हरवल्याची तक्रार दिली अन् भारतात पळून आला.

भारतीय तरुणीची अमेरिकेत निर्घृण हत्या; इंटरपोलने तामिळनाडूतून एक्स-बॉयफ्रेंडला घेतले ताब्यात
Nikita Godishala Murder Case: अमेरिकेत वास्तव्यास असलेली भारतीय महिला निकिता गोडिशाला हिच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि निकिताचा एक्स-बॉयफ्रेंड अर्जुन शर्मा याला इंटरपोल पोलिसांनी सोमवारी (5 जानेवारी) तमिळनाडू येथून अटक केली. हत्येनंतर आरोपी भारतात पळून आल्याचा दावा अमेरिकन पोलिसांनी केला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा सक्रिय झाल्या अन् अखेर आरोपीला ताब्यात घेतले.
अमेरिका-भारत समन्वयातून आरोपीचा माग काढला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निकिताच्या हत्येनंतर इंटरपोलने अमेरिकन तपास यंत्रणांच्या सहकार्याने अर्जुन शर्माचा माग काढण्यास सुरुवात केली होती. विविध एजन्सींमधील समन्वयातून अखेर तमिळनाडूतून आरोपीला अटक करण्यात यश आले. महत्त्वाची बाब म्हणजे, निकिता बेपत्ता असल्याची तक्रार स्वतः अर्जुन शर्मानेच अमेरिकन पोलिसांकडे दाखल केली होती.
तक्रार करुन देशाबाहेर पलायन
अमेरिकन पोलिसांच्या माहितीनुसार, ज्या दिवशी अर्जुनने अंकिता हरवल्याची तक्रार दिली, त्याच दिवशी तो भारतात पळून आला. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास वेगाने करत अर्जुनच्या अपार्टमेंटवर छापा टाकला. तिथे निकिताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. निकिताच्या शरीरावर चाकूने अनेक वार केल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर आरोपी फरार झाल्याने अमेरिकन पोलिसांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर शोधमोहीम सुरू केली होती. आता अखेर आरोपीला अटक करण्यात आले आहे.