जर आज लोकसभा निवडणुका झाल्या, तर भाजपला किती जागा मिळतील?; आला नवा सर्व्हे, जाणून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 20:10 IST2026-01-29T20:09:12+5:302026-01-29T20:10:12+5:30
देशात आज लोकसभा निवडणुका झाल्या, तर एनडीएला प्रचंड विजय मिळेल आणि भाजपा स्वबळावर बहुमताचा आकडा पार करेल, असा अंदाज या सर्व्हेमधून वर्तवण्यात आला आहे....

जर आज लोकसभा निवडणुका झाल्या, तर भाजपला किती जागा मिळतील?; आला नवा सर्व्हे, जाणून थक्क व्हाल!
एनडीएने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. मात्र, असे असले तरी, भारतीय जनता पक्षाला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणे शक्य झाले नव्हते. मात्र, आता आलेल्या एका नव्या सर्व्हेने सर्वांनाच चकित केले आहे. 'इंडिया टुडे'च्या 'मूड ऑफ द नेशन' सर्व्हेत, देशात आज लोकसभा निवडणुका झाल्या, तर एनडीएला प्रचंड विजय मिळेल आणि भाजपा स्वबळावर बहुमताचा आकडा पार करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या सर्व्हेच्या अंदाजानुसार, आज निवडणुका झाल्यास भाजपा स्वबळावर २८७ जागा जिंकत पूर्ण बहुमत मिळवेल. तर काँग्रेसच्या जागा कमी होऊन ८० वर येतील. आघाड्यांचा विचार करता, एनडीएला ३५२ जागा, तर 'इंडिया' आघाडीला १८२ जागांवर समाधान मानावे लागेल. याशिवाय इतर पक्षांच्या खात्यात ९ जागा जाऊ शकतात. यावरून, २०२४ च्या तुलनेत मोदी सरकारची पकड अधिक घट्ट झाल्याचे दिसते.
कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज -
भाजपा - २८७ (२०२४ मध्ये २४०)
काँग्रेस - ८० (२०२४ मध्ये ९९)
इतर - १७६
एनडीए - ३५२
इंडिया अलायन्स - १८२
इतर - ९
मतांच्या टक्केवारीचा विचार करता, एनडीएला ४७ टक्के मते मिळण्याचा अंदजा आहे. तर इंडिया अलायन्सला ३९ टक्के मते मिळताना दिसत आहेत. इतर पक्षांच्या वाट्याला १४ टक्के मते जात आहेत.
खरे तर, २०२४ च्या निवडणुकीत भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. पण, बहुमतानेच हुलकावणी दिली. मात्र, केंद्र सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांत झालेल्या हरियाणा, महाराष्ट्र यांसारख्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने जोरदार कामगिरी केली. या राज्यांमधील विजयाने आणि वाढलेल्या जनसमर्थनाने भाजपाची स्थिती पूर्वीपेक्षाही अधिक बळकट झाल्याचे या सर्व्हेतून दिसून येत आहे.