नवी दिल्ली-दरभंगा एक्सप्रेसला भीषण आग, डब्यांनी घेतला पेट, स्टेशन मास्तरांचं प्रसंगावधान, आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 20:01 IST2023-11-15T20:00:37+5:302023-11-15T20:01:06+5:30
New Delhi-Darbhanga Express Caught Fire: भारतीय रेल्वेमध्ये होत असलेल्या अपघातांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आज नवी दिल्ली-दरभंगा एक्स्प्रेसच्या काही डब्यांना भीषण आग लागली. हा अपघात इटावा के सराय भूपत रेल्वेस्टेशनजवळ घडला.

नवी दिल्ली-दरभंगा एक्सप्रेसला भीषण आग, डब्यांनी घेतला पेट, स्टेशन मास्तरांचं प्रसंगावधान, आणि...
भारतीय रेल्वेमध्ये होत असलेल्या अपघातांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आज नवी दिल्ली-दरभंगा एक्स्प्रेसच्या काही डब्यांना भीषण आग लागली. हा अपघात इटावा के सराय भूपत रेल्वेस्टेशनजवळ घडला. मिळालेल्या माहितीनुसार एक्स्प्रेसच्या एका बोगीमध्ये भीषण आग लागली. त्यामुळे संपूर्ण बोगी जळून खाक झाली. मिळालेल्या माहितीनुसार या ट्रेनमधून प्रमाणाहून अधिक प्रवासी प्रवास करत होते. या दरम्यान, प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारून प्राण वाचवले.
आतापर्यंत या अपघातामध्ये कुणालाही दुखापत झाल्याचं वृत्त नाही आहे. घटनास्थळावरून समोर येत असलेले फोटो आणि व्हिडीओमधून हा अपघात किती भीषण होता याची कल्पना येते. सीपीआरओने दिलेल्या माहितीनुसार इटावा स्टेशनपूर्वी सराय भूपत स्टेशन येथून ही ट्रेन जातअसताना स्टेशन मास्तरांनी एका स्लिपर कोचमधून धूर येत असल्याचे पाहिले.
त्यानंतर स्टेशन मास्तरांनी वॉकी टॉकीच्या माध्यमातून ट्रेन ड्रायव्हर आणि गार्ड यांना याबाबतची माहिती देऊन ट्रेन थांबवली. तसेच पॉवर ऑफ करण्यात आले. त्यानंतर स्लिपर कोचमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तसेच फायर ब्रिगेडच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. याआधी या आगीमध्ये काही लोक जखमी झाल्याचे आणि काही जणांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारून प्राण वाचवल्याचे वृत्त आले होते.
आज ट्रेनमध्ये आग लागण्याची ही एकमेव घटना घडलेली नाही. तर समस्तीपूर येथे भागलपूर येथून जयनगरला जणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये स्फोटासह आग लागली होती. यामध्ये एका महिला प्रवाशासह काही प्रवासी जखमी झाले होते. या प्रकरणी आपीएफने एका संशयिताला ताब्यात घेतलं असून, त्याची चौकशी सुरू आहे.