भाजपचे नवे अध्यक्ष मागासवर्गीय किंवा ओबीसी?; विनोद तावडेंनंतर आता नव्या नेत्याचे नाव आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 08:34 AM2024-06-18T08:34:39+5:302024-06-18T08:35:26+5:30

भाजपकडून राज्यसभेतही नेत्याचा शोध सुरू; दक्षिणेतील नावावरही विचार.

New BJP President Backward or OBC After Vinod Tawde now the name of a new leader is in the forefront | भाजपचे नवे अध्यक्ष मागासवर्गीय किंवा ओबीसी?; विनोद तावडेंनंतर आता नव्या नेत्याचे नाव आघाडीवर

भाजपचे नवे अध्यक्ष मागासवर्गीय किंवा ओबीसी?; विनोद तावडेंनंतर आता नव्या नेत्याचे नाव आघाडीवर

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भाजप नेतृत्व दोन महत्त्वाच्या नियुक्त्यांसाठी योग्य उमेदवारांच्या शोधात आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा केंद्रीय मंत्री झाल्यानंतर या जागेवर नियुक्ती करायची आहे, तसेच पीयूष गोयल हे लोकसभेत गेल्यामुळे राज्यसभेत त्यांच्या जागी नेत्याची निवड करायची आहे. नड्डा यांची आरोग्य व रसायने आणि खते मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यामुळे पक्षाला तातडीने नवीन 'कार्यकारी अध्यक्ष निवडावा लागणार आहे.

भाजपमधील एका उच्चपदस्थ सूत्राने सांगितले की, मागास आणि इतर मागास वर्गात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी या पदावर मागास अथवा इतर मागासवर्गीय नेत्याची निवड होऊ शकते. कारण त्यांनी मनापासून मत दिले नाही. २४ वर्षांपूर्वी बंगारू लक्ष्मण यांच्या निवडीनंतर भाजपने एकाही मागास समुदायाच्या व्यक्तीची अध्यक्षपदी नियुक्ती केली नाही. शिवराज सिंह चौहान यांना प्रतिष्ठित पद मिळाले असते मात्र आता ते मंत्रिमंडळात आहेत.

सभागृह नेतेपदासाठी नड्डा यांचे नाव चर्चेत

राज्यसभेत नड्डा हे सभागृह नेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. कारण पीयूष गोयल लोकसभेवर निवडून आले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रेल्वे, आयटी आणि माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांचाही या पदासाठी विचार केला जात आहे.

के. लक्ष्मण हेही चर्चेत

भाजपच्या अध्यक्षपदासाठी राज्यसभा खासदार के, लक्ष्मण यांचेही नाव चर्चेत आहे. ते सध्या ओबीसी मोर्चाचे प्रमुख आहेत. लक्ष्मण हे मूळचे तेलंगणाचे आहेत आणि दक्षिणेत पक्ष विस्तार करत आहेत. त्यांना संघाचे समर्थन आहे की, नाही याबाबत ठोस काही सांगता येत नाही.

महाराष्ट्रातून विनोद तावडेंचे नाव?

- महाराष्ट्रातून पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह दोन ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत आहेत. ते अमित शाह यांचे विश्वासू समजले जातात.

- निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांना भाजपमध्ये सामावून घेण्यासाठीच्या टीमचे तावडे यांनी नेतृत्व केले होते. तावडे हे आरएसएसच्या नेतृत्वाच्याही जवळचे आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

Web Title: New BJP President Backward or OBC After Vinod Tawde now the name of a new leader is in the forefront

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.