दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 15:44 IST2025-06-15T15:44:12+5:302025-06-15T15:44:53+5:30
झारखंडमधील जमशेदपूर येथील एका सामान्य कुटुंबातील रोहित कुमारने आपल्या मेहनतीने मोठ यश मिळवलं आहे. तु

दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
झारखंडमधील जमशेदपूर येथील एका सामान्य कुटुंबातील रोहित कुमारने आपल्या मेहनतीने मोठ यश मिळवलं आहे. तुमच्या आयुष्यात खूप समस्या आल्या तरी, तुमच्यात काहीतरी करण्याची इच्छा असेल आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची मेहनत करत असाल तर यश नक्कीच मिळतं हे रोहितने सिद्ध केलं आहे.
रोहित कुमारने NEET UG परीक्षा २०२५ (NEET २०२५) मध्ये ७२० पैकी ५४९ गुण मिळवून यश मिळवलं आहे. त्याने यापूर्वी दोनदा NEET परीक्षा दिली होती. पण त्याला यश मिळालं नाही, परंतु तिसऱ्या प्रयत्नात त्याने ही परीक्षा उत्तीर्ण करून इतिहास रचला आहे. कितीही वेळा अपयशी ठरलात तरी कधीही हार मानू नका.
यावर्षी रोहितने NEET परीक्षेत १२,४८४ वा ऑल इंडिया रँक आणि १,३१२ वा कॅटेगरी रँक मिळवला. त्याच्या यशानंतर सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत. यासोबतच त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रोहितच्या यशानंतर देशातील प्रसिद्ध ऑनलाइन शिक्षक आणि फिजिक्स वालाचे संस्थापक अलख पांडे स्वतः त्याला भेटायला गेले होते, ज्याचा व्हिडीओ इंटरनेटवरही व्हायरल होत आहे.
दिवसा काम, रात्री अभ्यास!
माध्यमांना मुलाखत देताना रोहित म्हणाला की, त्याला इतका टॉप रँक मिळेल असं वाटलं नव्हतं. त्याला वाटलं होतं की, त्याला एक सामान्य कॉलेज मिळेल, परंतु तो या रँकवर खूश आहे. तो दररोज सकाळी उठून आधी अभ्यास करायचा. त्यानंतर तो सकाळी ८ वाजता दुकान उघडायला जायचा आणि दुपारी १२ वाजता बंद करून घरी यायचा. रात्री NEET ची तयारी करायचा. त्यामुळेच त्याला घवघवीत यश मिळालं आहे.