"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:44 IST2025-11-14T14:42:26+5:302025-11-14T14:44:34+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या एनडीएला स्पष्ट बहुमत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, यावर आता काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली. 'निवडणूक आयोग अंतिम निकाल जाहीर करेपर्यंत वाट पाहावी. त्यांनी विजय आणि पराभवाची कारणे तपासण्याची गरज आहे,असंही थरुर म्हणाले.

"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए बहुमताच्या आकड्याच्या खूप पुढे आहे. दुपारी १ वाजेपर्यंत, एनडीए १९९ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, महाआघाडी फक्त ३८ जागांवर आघाडीवर आहे.
दरम्यान, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी बिहार निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया दिली. 'आपण निवडणूक आयोग निकाल जाहीर करण्याची वाट पाहावी. निवडणुकीत विजय किंवा पराभव अनेक घटकांवर अवलंबून असतो, असंही थरुर म्हणाले.
"पराभवाच्या कारणांचा आढावा घेतला पाहिजे"
'सध्या मुद्दा आघाडीचा आहे. ते मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत, परंतु आपण निवडणूक आयोग निकाल जाहीर करण्याची वाट पाहिली पाहिजे. "मला खात्री आहे की पक्षाची कारणे सविस्तरपणे अभ्यासण्याची जबाबदारी आहे, परंतु लक्षात ठेवा की आम्ही युतीमध्ये वरिष्ठ भागीदार नव्हतो आणि आरजेडीलाही त्यांच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे," असंही शशी थरुर म्हणाले.
यावेळी शशी थरुर यांनी काँग्रेसला सल्लाही दिली. 'निवडणुकीतील विजय किंवा पराभव ठरवताना, आपल्या कामगिरीचा संपूर्ण विचार करणे महत्त्वाचे आहे. निवडणुका अनेक घटकांवर अवलंबून असतात, असंही थरुरु म्हणाले.
बिहारमध्ये एनडीएच्या विजयात महिलांसाठीच्या सरकारी कार्यक्रमांनी महत्त्वाची भूमिका बजावली, यावर बोलताना शशी थरूर म्हणाले, आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महिला मतदारांना काही प्रोत्साहने देण्यात आली होती. आम्हाला ते आवडले किंवा नाही, ते आमच्या कायद्यानुसार कायदेशीर आहे.
"समाजातील काही घटकांना फायदा व्हावा यासाठी राज्य सरकारांनी अशा युक्त्या वापरल्याचे पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही," असे थरूर म्हणाले. महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये आपण असेच काहीतरी पाहिले आहे, असंही थरुर म्हणाले.