narendra modi tsunami remained in google trends with more searches than rahul gandhi on election | Google Trends मध्येही मोदीलाट; निकालाच्या दिवशीही राहुल गांधींची पिछेहाट

Google Trends मध्येही मोदीलाट; निकालाच्या दिवशीही राहुल गांधींची पिछेहाट

ठळक मुद्देगुगल सर्च इंजिनच्या ट्रेंड्समध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच बाजी मारली आहे.निकालाच्या दिवशी गुगल ट्रेंडमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या तुलनेत नरेंद्र मोदी जास्त सर्च केले गेले आहेत.

नवी दिल्ली -  भारतातील मतदारांनी देशाची सत्ता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपविण्याचा ऐतिहासिक कौल दिला. मोदींच्या झंझावातात, काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागल्याने सर्वत्र मोदींची चर्चा आहे. गुगल सर्च इंजिनच्या ट्रेंड्समध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच बाजी मारली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर झाला. निकालाच्या दिवशी गुगल ट्रेंडमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या तुलनेत नरेंद्र मोदी जास्त सर्च केले गेले आहेत. फक्त भारतातच नाही तर जगभरात नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्येही गुगल ट्रेंडमध्ये राहुल गांधींपेक्षा मोदींना अधिक सर्च केलं गेलं आहे. 

निकालाच्या दिवशी गुगल ट्रेंड्सने दिलेल्या आकड्यानुसार, भारतात इंग्रजीमध्ये Narendra Modi कीवर्डसोबत मोदींना 47 टक्के सर्च केलं गेलं. तर राहुल गांधींना  Rahul Gandhi कीवर्डसोबत 14 टक्के लोकांनी सर्च केलं आहे. तसेच मोदींना सर्च केल्यानंतरचा ग्राफ हा दिवसाच्या सुरुवातीपासून रात्री 12 पर्यंत वाढलेलाच होता. जगभरात सर्च करणाऱ्यांच्या यादीत देखील मोदींनीच बाजी मारली आहे. आकडेवारीनुसार, जगभरात 54 टक्के लोकांनी गुगलवर नरेंद्र मोदी तर 18 टक्के लोकांनी राहुल गांधी सर्च केलं आहे. 

पाकिस्तानमध्ये 24 टक्के लोकांनी नरेंद्र मोदी सर्च केलं तर 9 टक्के लोकांनी राहुल गांधी यांना सर्च केलं आहे. अमेरिकेत मात्र सुरुवातीला राहुल गांधीना सर्वाधिक सर्च करण्यात आलं. 1.22 वाजेपर्यंत 93 टक्के लोकांनी राहुल गांधी तर 83 टक्के लोकांनी मोदींनी सर्च केलं. मात्र शेवटी मोदींनीच बाजी मारली. 23 मे रोजी अमेरिकेत 41 टक्के लोकांनी नरेंद्र मोदी सर्च केलं. लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि एनडीएने दणदणीत विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि यूपीएला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : 'भारतीय भाग्यवान कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान'

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यशानंतर जगभरातील नेते मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. तसेच त्यांना शुभेच्छा देत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (24 मे) मोदींना फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भारतीय भाग्यशाली आहेत, कारण त्यांच्याकडे मोदी आहेत, असं देखील ट्रम्प यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीटरवरून मोदींची स्तुती केली आहे. नरेंद्र मोदींना विजयाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नुकतीच फोनवरुन चर्चा झाली. मोठ्या राजकीय विजयाबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं. ते भारताचे महान नेते आहेत. भारतीय नागरिक भाग्यवान आहेत, कारण त्यांच्याकडे मोदी आहेत' असं ट्वीट ट्रम्प यांनी केलं आहे. पंतप्रधान मोदींनीही त्यांना शुभेच्छा देणाऱ्या व्यक्तीचे आभार मानले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी देखील पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. हिंदी भाषेत ट्वीट करून त्यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

'माझ्या अपेक्षांपेक्षा तुमची कामगिरी उत्तम', PMO कर्मचाऱ्यांशी मोदींनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे सरकार स्थापन करण्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयातील (PMO) कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी माझ्या अपेक्षांपेक्षा तुमची कामगिरी उत्तम असल्याचे सांगत कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. आपली स्वप्ने कितीही सुंदर असली, संकल्प कितीही दृढ असला आणि हेतू कितीही चांगला असला तरी समर्पित टीम नसेल तर अपेक्षित यश मिळणे अत्यंत कठीण असते. पाच वर्षात अखंड एकनिष्ठ साधना, ज्याचे लक्ष देशातील सामान्य व्यक्तीच्या जीवनात आशा आणि बदल करणे. या सर्व कामांचे क्रेडिट तर पंतप्रधान कार्यालयाला जाते, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: narendra modi tsunami remained in google trends with more searches than rahul gandhi on election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.