टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:01 IST2025-09-29T16:00:53+5:302025-09-29T16:01:25+5:30
Asia Cup 2025, Ind Vs Pak: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन करताना हा विजय म्हणजे मैदानावरील ऑपरेशन सिंदूर असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताच विरोधकांनीही त्यांना टोला लगावला आहे.

टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
काल झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय संघाने पाकिस्तानवर मात करत विजेतेपद पटकावले. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी खेळण्यास तीव्र विरोध होत असतानाही भारत आणि पाकिस्तानचे संघ आशिया चषक स्पर्धेत तीन वेळा आमने सामने आले होते. तसेच भारतीय संघाने त्यांना तिन्ही वेळा चारीमुंड्या चीत केले होते. दरम्यान, अंतिम सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन करताना हा विजय म्हणजे मैदानावरील ऑपरेशन सिंदूर असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताच विरोधकांनीही त्यांना टोला लगावला आहे.
भारताने आशिया चषकचा अंतिम सामना जिंकताच ‘’मैदानावरही ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं आहे. निकाल तोच. भारताचा विजय झाला. भारतीय संघातील सर्व खेळाडूंचं अभिनंदन’’. अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर केली. आशिया चषक स्पर्धेतील सुपर-४ फेरीत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने सामने आले असताना पाकिक्तानचा गोलंदाज हारिस रौफ याने विमान पाडल्याचा इशारा करत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी केलेला ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख हा पाकिस्तानसाठी इशारा असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या पोस्टमुळे पाकिस्तान सरकारमधील मंत्री आणि अधिकाऱ्यांचा तिळपापड झाला आहे. तर बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाच्या विजयाची तुलना ऑपरेशन सिंदूरशी केल्याने भारतात राजकारणाला तोंड फुटले आहे. बिहारमधील महाआघाडीचे नेते तेजस्वी यादव यांनी नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
मोदींनी भारतीय संघाला शुभेच्छा देताना ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केल्यानंतर तेजस्वी यादव यांनी भारतीय संघाला शुभेच्छा देताना पाकिस्तानसोबत झालेल्या शस्त्रसंधीचा आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करत मोदींची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
तेजस्वी यादव यांनी लिहिले की, आशिया चषक २०२५ चं विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन, भारतीय क्रिकेटपटूंनी अंतिम फेरीत जसं पाकिस्तानला पराभूत केलं, तसंच भारतीय लष्कर दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करणार होतं. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक शस्त्रसंधी केली, असा टोला तेजस्वी यादव यांनी लगावला. उल्लेखनीय बाब म्हणजे तेजस्वी यादव यांनी ही पोस्ट नरेंद्र मोदींनी केलेल्या पोस्टनंतर काही मिनिटांतच केली होती.