नंदगावची ‘टॅायलेट - एक अपूर्ण प्रेमकथा’; अक्षय कुमारच्या चित्रपटाची झाली होती शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 09:06 AM2022-02-08T09:06:03+5:302022-02-08T09:06:43+5:30

चित्रपटात अक्षय कुमारचे जे घर दाखवले आहे, ते १३५ वर्षे जुने असल्याचे घरमालक राजन पंडित सांगतात. छाता विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या नंदगावला पौराणिक महत्त्व आहे.

Nandgaon's Toilet - Ek Apurn Prem Katha, Akshay Kumar's film was shot here | नंदगावची ‘टॅायलेट - एक अपूर्ण प्रेमकथा’; अक्षय कुमारच्या चित्रपटाची झाली होती शूटिंग

नंदगावची ‘टॅायलेट - एक अपूर्ण प्रेमकथा’; अक्षय कुमारच्या चित्रपटाची झाली होती शूटिंग

googlenewsNext

गजानन चोपडे -

नंदगाव (मथुरा) : मथुरा ते नंदगाव ५८ किमीचे अंतर. श्रीकृष्णाने जेथे बाललीला केल्या, त्याच गावात झाले ‘टॅायलेट-एक प्रेमकथा’ या चित्रपटाचे चित्रीकरण. ज्या चित्रपटाने अख्ख्या देशात टॅायलेटचे महत्त्व पटवून सांगितले, त्याच चित्रपटातील टीमवर नंदगावच्या घराचे मालक नाराज आहेत. ‘टॅायलेट’ या मोहिमेचा येथे फज्जा उडाला आहे.

चित्रपटात अक्षय कुमारचे जे घर दाखवले आहे, ते १३५ वर्षे जुने असल्याचे घरमालक राजन पंडित सांगतात. छाता विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या नंदगावला पौराणिक महत्त्व आहे. ‘टॅायलेट’ या चित्रपटानंतर प्रकाशझोतात आलेले हे गाव आता राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचे झाले आहे. शासनाने घरोघरी शौचालय बांधण्याची मोहीम राबवली खरी, पण त्याला अपेक्षेनुसार यश आले नाही. सार्वजनिक शौचालये घाणीने बरबटलेली असल्याने त्यांचा फारसा वापर होत नाही. तथापि, आम्ही शंभर टक्के शौचालयाचा वापर करतो, असे नागरिक सांगतात. राजन पंडित यांनी लोकमतशी संवाद साधताना अनेक बाबींचा उलगडा केला. ज्या घरात ‘टॅायलेट’चे चित्रीकरण झाले त्याची प्रत्येक खोली दाखवली.

याच घरात आजवर नव्हते शौचालय -
राजन पंडित म्हणाले, शूटिंग झाले तेव्हाही या घरात शौचालय नव्हते. हे तर आम्ही आता बांधून घेतले. शासकीय योजना चांगली असली तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यानेच ती फसवी ठरते. 

 

माझी फसवणूक झाली, ...अन् जागाही गेली
चित्रपटात अक्षय कुमार ज्या ठिकाणी शौचालय बांधतो, ती जागा शूटिंग संपल्यानंतर इतरांनी बळकावली. या बांधकामासाठी आपला विरोध होता, पण माझे कुणी ऐकले नाही. त्याचा फटका बसला अन् ती जागाही गेली, असा आरोप राजन पंडित यांनी केला आहे. एक महिना २३ दिवस चित्रपटाचे चित्रीकरण या घरात झाल्याचेही त्यांनी सांगितले.  

डॅमेज कंट्रोलसाठी भाजपची कसरत लोकसभेत मथुरा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि उत्तर प्रदेश निवडणुकीच्या स्टार प्रचारक हेमामालिनी यांच्या जिल्ह्यात पक्षातील डॅमेज कंट्रोल करताना मोठी कसरत करावी लागत आहे.२०१७च्या निवडणुकीत पाचपैकी चार जागा एकहाती राखणाऱ्या भाजपला यंदा मथुरा मतदारसंघात बंडखोरीचा फटका बसत आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने एस.के. शर्मा  यांनी ऐनवेळी हत्तीवर  स्वार होत बहुजन समाज पार्टीत घरठाव केला.

मथुरा मतदारसंघातून ते रिंगणात आहेत. तिकडे ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा यांना २०१२ मध्ये विजयी झालेले काँग्रेसचे प्रदीप माथूर आव्हान देत आहेत. त्यामुळे भाजप नेते या मतदारसंघात पूर्ण ताकदीने उतरले आहेत. विशेष म्हणजे एस.के. शर्मा सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याने ते भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतात.
 

 

Web Title: Nandgaon's Toilet - Ek Apurn Prem Katha, Akshay Kumar's film was shot here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.