निवडणूक संपताच नमो टीव्हीनं गाशा गुंडाळला; डीटीएचवरुन गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 20:38 IST2019-05-20T20:36:46+5:302019-05-20T20:38:09+5:30
नमो टीव्ही अचानक डीटीएचवरुन गायब

निवडणूक संपताच नमो टीव्हीनं गाशा गुंडाळला; डीटीएचवरुन गायब
मुंबई: लोकसभा निवडणूक संपताच नमो टीव्ही गायब झालं आहे. अचानक ग्राहकांच्या सेट टॉप बॉक्सवर आलेल्या नमो टीव्हीनं तितक्याच अचानकपणे गाशा गुंडाळला आहे. 26 मार्चला लोकसभा निवडणूक सुरू होण्याच्या काही दिवस आधी नमो टीव्ही डीटीएचवर दिसू लागलं होतं. त्याआधी या वाहिनीची कोणतीही जाहिरात दिसली नव्हती. या टीव्हीवर कायम पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं, मुलाखती आणि कार्यक्रम दाखवले जायचे. अचानक आपल्या डीटीएचवर ही वाहिनी पाहून प्रेक्षकांना धक्का बसला होता.
विरोधकांनी नमो टीव्हीवर जोरदार टीका केली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह अनेक नेत्यांनी यावरुन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला लक्ष्य केलं होतं. नियम धाब्यावर बसवून या वाहिनीला परवानगी दिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. सरकारनं आपला प्रपोगेंडा राबवण्यासाठी ही वाहिनी आणल्याचा आरोपदेखील झाला होता. टाटा स्काय, व्हिडीओकॉन, डिश टीव्हीवर नमो टीव्ही वाहिनी मोफत दाखवली जात होती.
वाद झाल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं निवडणूक आयोगानं वाहिनीला नोटीस बजावली. ही वाहिनी नोंदणीकृत नसल्याचं उत्तर मंत्रालयानं निवडणूक आयोगाला दिलं होतं. वाहिनी नोंदणीकृत नसल्यानं तिच्या प्रेक्षपणासाठी परवानगीची आवश्यकता नाही, असंदेखील मंत्रालयानं उत्तरात नमूद केलं होतं. यामुळे विरोधकांनी आयोग आणि मंत्रालयावर टीकेची झोड उठवली होती. आता मतदान संपताच नमो टीव्ही गायब झाल्यानं केवळ निवडणुकीसाठी ही वाहिनी सुरू करण्यात आली होती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.