Nagrota encounter terrorists entered by tunnel in samba in jammu kashmir | नगरोटा चकमकीवर धक्कादायक खुलासा; जवानांनी मोठा कट उधळला, भारतात असे घुसले होते दहशतवादी!

नगरोटा चकमकीवर धक्कादायक खुलासा; जवानांनी मोठा कट उधळला, भारतात असे घुसले होते दहशतवादी!

ठळक मुद्देहे दहशतवादी पाकिस्तानातील शकरगडहून सांबा सेक्टरमध्ये भूयारी मार्गाने आले होते.11 एके-47 रायफल आणि पिस्तुलही जप्त करण्यात आली आहेत. जानेवारी महिन्यातही अशाच प्रकारची चकमक झाली होती, त्यात 3 दहशतवादी मारले गेले होते.

श्रीनगर - नगरोटा चकमकीसंदर्भात तपास करणाऱ्या संरक्षण दलाच्या संस्थांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरीसाठी भूयारी मार्गाचा वापर केल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. हे दहशतवादीपाकिस्तानातील शकरगडहून सांबा सेक्टरमध्ये भूयारी मार्गाने आले होते. तसेच, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सामानातील शस्त्र आणि दारूगोळा आधीपासूनच ट्रकमध्ये होता, अशी शक्यताही संरक्षण संस्थांनी व्यक्त केली आहे.

संरक्षण संस्थांनी दावा केला, की सीमेवर तार फेंसिंग सोबत कुठल्याही प्रकारची छेडछाड झालेली नाही. यामुळे भूयारी मार्गानेच दहशतवादी सांबा सेक्टरमध्ये आले असल्याचे मानले जात आहे. खरे तर भूयारी मार्गाने दहशतवादी भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे नाही.

भरतीय जवानांनी मोठा कट उधळला -
जम्मूमध्ये नगरोटाजवळ गुरुवारी झालेल्या चकमकीत मारले गेलेले जैशचे दहशतवादी मोठ्या प्रमाणावर दारूगोळा घेऊन जात होते. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 11 एके-47 रायफल आणि पिस्तुलही जप्त करण्यात आली आहेत. या दहशतवाद्यांचा मोठा कट असण्याची पूर्ण शक्यता आहे. हे चारही दहशतवादी काश्मीरकडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये होते. पोलिसांनी हा ट्रक टोल प्लाझाजवळ थांबवला होता. यानंतर उडालेल्या चकमकीत हे चारही दहशतवादी मारले गेले.

11 एके-47 रायफल आणि 3 पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त -
दहशतवाद्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला गुरुवारी सकाळी 5 वाजेच्या सुमारास आडवण्यात आले, तेव्हा ट्रक ड्रायव्हर गडबडला आणि ट्रकमधून उडी मारून पळून गेला. यानंतर त्या ट्रकमधून पोलिसांच्या चमूवर गोळीबार सुरू झाला. नंतर प्रत्युत्तरातील कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी मारले गेले. त्यांच्याकडून 11 एके-47 रायफल आणि 3 पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. प्रत्येक दहशतवादी जवळपास 3 एके-47 रायफल घेऊन जात होता. यापूर्वी जानेवारी महिन्यातही अशाच प्रकारची चकमक झाली होती. त्यात 3 दहशतवादी मारले गेले होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Nagrota encounter terrorists entered by tunnel in samba in jammu kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.