आणखी एक ज्योती? १२ वर्षांच्या मुलाला सोडून नागपूरची महिला कारगिलमधून गायब, पाकिस्तानी नंबरवर झालेली फोनाफोनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 10:47 IST2025-05-21T10:39:22+5:302025-05-21T10:47:09+5:30
१७ मेपासून बेपत्ता असलेली सुनीता जमगडे ही महिला कारगिलजवळील गावातून अचानक गायब झाली होती. विशेष म्हणजे, ती बेपत्ता होण्याआधी पाकिस्तानशी संपर्कात होती, अशी माहिती पोलिसांकडून समोर आली आहे.

आणखी एक ज्योती? १२ वर्षांच्या मुलाला सोडून नागपूरची महिला कारगिलमधून गायब, पाकिस्तानी नंबरवर झालेली फोनाफोनी
पाकिस्तानी गुप्तहेर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा यांच्या चौकशीतून दररोज धक्कादायक खुलासे होत असतानाच, आता नागपूरच्या सुनीता जमगडे या महिलेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. १७ मेपासून बेपत्ता असलेली सुनीता जमगडे ही महिला कारगिलजवळील गावातून अचानक गायब झाली होती. विशेष म्हणजे, ती बेपत्ता होण्याआधी पाकिस्तानशी संपर्कात होती, अशी माहिती पोलिसांकडून समोर आली आहे.
लडाख पोलीस प्रमुख एस.डी. सिंह जामवाल यांनी सांगितले की, सुनीता जमगडे ही काही पाकिस्तानी मोबाईल नंबरसोबत संपर्कात होती. तपासात असंही उघड झालं आहे की, तिने यापूर्वीही यापूर्वीही अटारी-वाघा बॉर्डरमार्गे सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे यावेळी ती प्रत्यक्षात पाकिस्तानमध्ये गेलेली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१२ वर्षांच्या मुलाला सोडलं एकटं
सुनीता ही तिच्या १२ वर्षांच्या मुलासह लडाखमधील हुंडरमन गावात गेली होती. मात्र, तिने मुलाला तिथेच एकटं सोडलं आहे. सध्या तो मुलगा बाल कल्याण समितीच्या देखरेखीखाली आहे. सुनीता बेपत्ता झाल्याबाबत तिच्या भावाने कपिल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सहकार्य करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई
काही अहवालांनुसार, सुनीता जमगडेला सीमापार जाण्यात मदत करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र अद्याप सुनीता खरंच पाकिस्तानमध्ये गेली आहे का, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. तिच्या आर्थिक व्यवहारांचे स्रोतही संशयास्पद असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
कोण आहे सुनीता जमगडे?
सुनीता ही नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती. ती अचानक लडाखमध्ये कशी पोहोचली आणि सीमेजवळ कशासाठी गेली, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. लडाख पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणा याप्रकरणी सखोल तपास सुरू असून, सुनीता जमगडे पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांसोबत संबंधित असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.