नाग-नागिणीच्या प्रणयाचे बरेच व्हिडीओ, प्रत्यक्षात पाहिले असतील. मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात नागाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर नागीण त्याच्या समोरच तासंतास उभी ठाकल्याचा व्हिडीओ आला आहे. एका शेतकऱ्याने जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी जेसीबी बोलविला होता. काम सुरु असताना एका बिळात असलेल्या नाग-नागिणीला दुखापत झाली. यात नागाचा मृत्यू झाला तर नागीण जखमी झाली होती. यानंतर हा प्रकार घडला आहे.
जेसीबी चालकाच्या हे लक्षात येताच त्याने काम थांबवून नागाला काठीने बाहेर काढले. परंतू तो मेलेला होता. त्याला पाणी पाजण्याचाही प्रयत्न करण्यात आला. तितक्यात त्या बिळातून जखमी झालेली नागीण बाहेर आली. या प्रकाराची माहिती गावभर पसरू लागली. लोक जमा झाले, परंतू नागीण काही केल्या जागची हलत नव्हती. ती नागाजवळच फना काढून बसली होती.
बराच वेळ झाला तरी नागीण जागची हलत नव्हती, हे पाहून जागा मालकाने सर्पमित्राला बोलविले. त्याने नागिणीवर प्राथमिक उपचार केले व तिला पकडून जंगलात सोडले. यानंतर नागावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि काम पुन्हा सुरु करण्यात आले.
सर्पमित्र सलमान पठाण यांनी सांगितले की, ही जोडी १६-१७ वर्षे सोबत राहत आहे. थंडीच्या काळात हे साप अधिकतर जमिनीच्या आताच राहतात. याचवेळी जेसीबी मशीनचे काम सुरु झाल्याने ते कचाट्यात आले. नागाच्या मृत्यूमुळे नागिणीला मोठा धक्का बसला आहे, यामुळे ती त्याच्याजवळ कित्येक तास बसून दु:ख व्यक्त करत होती.