"प्रत्येक सनातनीला माझा संदेश...", राकेश किशोर यांच्याजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 15:08 IST2025-10-10T15:07:46+5:302025-10-10T15:08:18+5:30
दोन दिवसापूर्वी सरन्यायाधीश बीआर गवई यांच्यावर बूट फेकल्याची घटना घडली. या घटनेनंतर दिल्ली पोलिस हाय अलर्टवर आहेत.

"प्रत्येक सनातनीला माझा संदेश...", राकेश किशोर यांच्याजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली
दोन दिवसापूर्वी सरन्यायाधीश बीआर गवई यांच्यावर बूट फेकल्याची घटना घडली. या घटनेनंतर दिल्ली पोलिस हाय अलर्टवर आहेत. न्यायालय क्रमांक १ बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या कोर्टात सरन्यायाधीश खटल्यांची सुनावणी करतात. सुरक्षा अधिकाऱ्यांनाही दक्षता वाढविण्यास सांगण्यात आली आहे. दरम्यान, चौकशीदरम्यान पोलिसांना वकील राकेश किशोर यांच्याकडून एक चिठ्ठी सापडल्याची माहिती समोर आली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी सनातन धर्माचा कोणताही अपमान सहन करणार नाहीत असे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेमागील हेतूबद्दल किशोर यांना विचारपूस करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिरातील भगवान विष्णूच्या मूर्तीबद्दल सरन्यायाधीशांच्या टिप्पण्यांमुळे ते नाराज झाले होते. पोलिसांना त्या वकिलाकडून एक चिठ्ठी सापडली आहे. "माझा संदेश प्रत्येक सनातनीसाठी आहे. हिंदुस्थान सनातनचा अपमान सहन करणार नाही," यामध्ये असे लिहिले होते.
पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे आणि दोन अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. मंगळवारी दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. याव्यतिरिक्त, एक अंतर्गत आदेश जारी करण्यात आला आहे, यामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांच्या तैनातीदरम्यान बूट फेकणे आणि शाई फेकणे यासारख्या घटनांसाठी सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
खासदार निलेश लंकेंनी संविधान भेट दिली
भर न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासह अनेकांनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला. महाराष्ट्रात विरोधी पक्षांकडून निषेध आंदोलने करण्यात आली. राकेश किशोर यांच्याविरुद्ध बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राकेश किशोर यांचे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी वकील राकेश किशोर यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी निलेश लंके यांनी वकील राकेश किशोर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत भेट म्हणून देण्याचा प्रयत्न केला. निलेश लंके यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली.