"माझी मुलगी म्हणतेय ती निर्दोष आहे"; ज्योतीला तुरुगांत भेटून आल्यावर काय म्हणाले वडील हरीश मल्होत्रा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 16:43 IST2025-05-28T16:41:19+5:302025-05-28T16:43:19+5:30
ज्योतीला भेटण्यासाठी हरीश मल्होत्रा हिसारच्या मध्यवर्ती कारागृहात पोहोचले होते. मुलीला भेटल्यानंतर हरीश यांनी माध्यमांशी संवाद साधला.

"माझी मुलगी म्हणतेय ती निर्दोष आहे"; ज्योतीला तुरुगांत भेटून आल्यावर काय म्हणाले वडील हरीश मल्होत्रा?
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राला १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आता तिचे वडील हरीश मल्होत्रा यांनी तुरुंगात जाऊन आपल्या मुलीची भेट घेतली. ज्योतीला भेटण्यासाठी हरीश मल्होत्रा हिसारच्या मध्यवर्ती कारागृहात पोहोचले होते. मुलीला भेटल्यानंतर हरीश यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुलीशी आपलं काय बोलणं झालं जे सांगताना ते म्हणाले की, "ज्योती म्हणतेय की, ही माझी चूक नाही. माझी मुलगी म्हणतेय की, ती निर्दोष आहे". यावेळी ते भावनिक देखील झाले. ज्योती मल्होत्राला यापूर्वी ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर तिला पुन्हा १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
पाकिस्तानी गुप्तचर एजंट्सच्या संपर्कात होती ज्योती
ज्योती मल्होत्राला काही दिवसांपूर्वी हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. ती पाकिस्तानी गुप्तचर एजंट्सच्या संपर्कात होती, असा आरोप आहे. ती आयएसआयशी संबंधित लोकांना संवेदनशील माहिती देत होती आणि याशिवाय, तिने ऑपरेशन सिंदूर दरम्यान काही महत्त्वाची माहिती देखील हस्तांतरित केली. मात्र, हिसारचे एसपी शशांक कुमार म्हणाले की, आतापर्यंत ज्योतीकडे कोणतीही संवेदनशील माहिती असल्याचा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही.
एवढेच नाही तर त्यांनी सांगितले की, ज्योती मल्होत्राचे कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तरीही, अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या चार गुप्तचर घटकांच्या संपर्कात होती. तिचा कोणाशी काही संबंध होता का?, ती सर्व काही जाणूनबुजून असे करत होती की, ती नकळत त्यांच्या जाळ्यात अडकली होती याचा तपास केला जात आहे.
ज्योतीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल!
लाहोरच्या अनारकली मार्केटमध्ये ट्रॅव्हल व्लॉग बनवत असताना ज्योतीला ६ बंदूकधारी सुरक्षा कवच देत असल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. दरम्यान, हिसार पोलिसांनी सांगितले की, जोपर्यंत ज्योतीबाबत कोणतेही ठोस पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत माध्यमांनी खळबळजनक बातम्या प्रकाशित करू नयेत. सध्या पोलीस ज्योती मल्होत्राच्या बँक खात्यांवर आणि आर्थिक व्यवहारांवरही लक्ष ठेवून आहेत.